सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना रेशनकार्ड काढण्यासाठी मंद्रूप अप्पर तहसील व दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाकडून जाच सुरू झाला आहे. रेशनकार्डासाठी दोन्ही कार्यालयाने एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू केल्याने मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत.

राज्य शासनाने दक्षिण सोलापूर तालुक्याचे विभाजन करून मंद्रूपसह ३७ गावांसाठी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती केली आहे. या कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून शासनाला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामध्ये मंद्रूप, विंचूर, निंबर्गी मंडलामधील ३७ गावांसाठी अपर तहसील कार्यालयाचे क्षेत्र निवडण्यात आले होते. यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती. शिवाय महसूल वन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयांकडून अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यासाठी तातडीने माहिती सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार या अपर तहसील कार्यालयासाठी अपर तहसीलदार एक, नायब तहसीलदार तीन, अव्वल कारकून तीन, लिपीक सात, शिपाई चार वाहनचालक एक अशी १९ पदे मंजूर करावेत असे प्रस्तावात नमूद केले होते. शिवाय दक्षिण तहसील कार्यालयाकडून तलाठी सजा मंडल वाढीची मागणी शासनाकडे प्रस्तावित केली होती. याचाही समावेश मंद्रूप अपर तहसील कार्यालयात करणे शक्य असल्याचे प्रस्तावात नमूद केले होते.

गोदामामध्ये कार्यालय 

दक्षिणसोलापूर तालुक्याची वाढती लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ यामुळे दक्षिण तहसीलवर मोठा ताण पडत होता. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने मंद्रूप येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय मंजूर करणे आवश्यक होते. यासाठी मंद्रूप येथे गट क्रमांक ५७६ हेक्टर ७४ आर ही शासकीय जागा नवीन शासकीय धान्य गोदामाच्या शेजारी उपलब्ध आहे. या जागेवर अपर तहसील कार्यालय सुरू करता येईल. तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी स्वतंत्र प्रस्ताव बांधकाम विभागाकडून पाठवण्यात आला आहे. पण तूर्तास शासकीय गोदामातच मंद्रूपचे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले.  पण पदे तितकी मंजूर झाली नाहीत. मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयात पुरवठा शाखाच निर्माण करण्यात आली नाही. त्यामुळे रेशनचे कामकाज दक्षिण तहसील कार्यालयात चालत आहे. शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना जाहीर केली. या योजनेसाठी रेशनकार्ड आवश्यक असल्याने कित्येक नवीन सुनांचे रेशन कार्डमध्ये नावच नाही. त्यामुळे नवीन कार्ड किंवा नाव समाविष्ट करण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयात जात आहेत.  त्यांना दक्षिण सोलापूर तहसीलच्या कार्यालयात जाण्यास सांगितले जात आहे. दक्षिणच्या कार्यालयात आल्यावर मंद्रूपला जा असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी अडचणीत आल्या आहेत. तहसील कार्यालयातुन होत असलेली ही ससेहोलपट तात्काळ थांबावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दक्षिण तालुक्याची सद्यस्थिती… 

दक्षिण सोलापूर तालुक्याचे ११९५.३० चौ. कि. मी. इतके क्षेत्रफळ आहे.  तालुक्यातील ९० गावांसाठी महसुली मंडळ ४० तलाठी सजा होती. यापैकी मंद्रूप, निंबर्गी, विंचूर या तीन मंडलामधील ३७ गावांसाठी अपर तहसील कार्यालय निर्मित करण्यात आले आहे.

या ३७ गावांचा समावेश… 

मंद्रूप मंडळातील मंद्रूप, बसवनगर, टाकळी, कुरघोट, बरूर, नांदणी, चिंचपूर, हत्तरसंग, बोळकवठे, कुडल, बंदलगी, औराद, बिरनाळ, वडकबाळ, होनमुर्गी, विंचूर मंडळातील विंचूर, शंकरनगर, कुसूर, तेलगाव, खानापूर, कंदलगाव, गावडेवाडी, येळेगाव, गुंजेगाव, अकोले मं., वांगी, मनगोळी, अंत्रोळी, वडापूर, निंबर्गी मंडळातील निंबर्गी, माळकवठे, कारकल, भंडारकवठे, सादेपूर, लवंगी, बाळगी, औज मं. या गावांचा कारभार मंद्रूप अपर तहसील कार्यालयातून आहे. पण पुरवठा शाखा नसल्याने आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना रेशन कार्डची अडचण जाणवत आहे. नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी एजंट 3000 रुपये मागत आहेत अशाही तक्रारी लाडक्या बहिणीने केल्या आहेत.त्यामुळे रेशन कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *