सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील श्री यमाई देवी मंदिरातील चोरी प्रकरणाला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत पण पोलिसांचा तपास ठप्प असल्याबाबत विष्णू जगताप यांनी लक्ष वेधले आहे.
23 डिसेंबर 2019 रोजी श्री यमाई देवी मंदिरात चोरी झाल्याचे दर्शनाला आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्याने मंदिरातील देवीच्या मूर्तीपुढील चांदीची प्रभावळ (११ किलो), चांदीची उत्सव मूर्ती(१:५०० किलो), चांदीचे किरीट (७ किलो), चांदीच्या दोन समई (३ किलो), चांदीची देवीच्या पाठीमागील कमान (४० किलो) असे सुमारे एकूण ६२:५०० किलोची चांदी तर ५ धुळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे रोख रक्कम २:५० लाख रुपये असा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नोंद करण्यात आले आहे. या घटनेनंतर श्री यमाई देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली होती. चोरट्यांचा छडा लागावा म्हणून मागणी होत होती. पण या चोरीच्या तपासाकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. या घटनेला पाच वर्षे होत आले असून पोलिसांनी तपास बंद केल्याबाबत जगताप यांनी मुख्यमंत्र्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.