सोलापूर : सोलापूरचे माजी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महाराज यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत गुजरातच्या लॅबचा अहवाल जात पडताळणी समितीसमोर गुरुवारी सुनावणीसाठी सादर करण्यात आला. शाईमध्ये बदल असल्याचे अहवालात नमूद आहे. उमरगा तहसील कार्यालयाने पुरावा दाखल सादर केलेल्या रजिस्टरला मात्र तक्रारदारांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे या सुनावणीला माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज गैरहजर होते.
सोलापूर जात पडताळणी समितीचे अध्यक्ष पवार, सदस्य शिंदे, कवले व विधी तज्ञ शिवलकर यांच्यासमोर माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत सुनावणी झाली. तक्रारदार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, भरत कनकुरे यांनी उपस्थित झालेल्या पुराव्यावर मुद्दे मांडले व आक्षेप घेतला. अक्कलकोट तहसीलमधील जात पडताळणी दाखल्या संदर्भात तक्रारदारांनी गुजरातच्या लॅबचा अहवाल सादर केला. या अहवालात शाईमध्ये व शब्दांमध्ये बदल असल्याचे नमूद केल्याचे त्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सही संदर्भात एका दुसऱ्या लॅबचा अहवाल मागविण्यात आला होता. यात शाईचा रंग वेगळा आहे व शब्दांमध्ये फरक आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालावरही चर्चा झाली.
तक्रारदारांनी समितीच्या सुनावणीला हरकत घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने दहा ऑगस्टपर्यंत सुनावणी संपवून अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते. मुदत संपल्यानंतर ही समिती वेळ काढूपणा करीत आहे. हा न्यायालयाचा अवमान असल्याचे तक्रारदाराने नमूद केले. त्यावर समितीने आम्हाला अधिकार आहे, असे स्पष्टीकरण दिले. टाइमपास सुरू आहे, न्यायालयाला अर्धवट माहिती पाठवू नका, असा विरोध तक्रारदारांनी केला. आतापर्यंतच्या सुनावणीला महाराज गैरहजर राहिले आहेत. पुढील सुनावणीला त्यांना हजर राहण्याबाबत सूचना करावी, अशी विनंती करण्यात आली.
उमरगा तहसीलचा पुरावा
दुपारच्या सत्रात उमरगा तहसीलचा पुरावा सादर करण्यात आला. नायब तहसीलदार अमित भारती यांनी जातीच्या दाखल्याचे नोंदणी रजिस्टर आणले होते. 80 वर्षांपूर्वीचे अडीचशे जातीच्या नोंदी असणारे रजिस्टर करकरीत कसे? असा सवाल मुळे आणि कनकुरे यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे इतक्या नोंदीमध्ये फक्त एकट्या महाराजांच्या नाते संबंधित जातीचा उल्लेख कसा? असा आक्षेप घेतला. बेडा जंगम जातीविषयी पाच लोकांची ग्रह चौकशीचा अहवाल हवा आहे. त्याबाबत पाच लोकांचे नावे, पत्ता व संपर्क नंबर पुरावा म्हणून हजर केले.