सोलापूर : ओ भाऊ थांबा, मी तिथे येतो, मला आता तुमची गरज लागणार आहे, असे जेऊरचे माजी झेडपी सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना उद्देशून म्हणताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते व कुंभारीच्या श्री गेनसिद्धचे पुजारी अण्णाराव बाराचारे यांनी श्री च्या श्रावण उत्सव समाप्तीच्या निमित्ताने आयोजित महाप्रसाद वाटपास सर्वांना निमंत्रित केले होते. या उत्सवाला आमदार सुभाष देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, झेडपीचे माजी सदस्य मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर, विलास चव्हाण, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्नगले यांच्यासह विविध मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी बाराच्या परिवाराने मान्यवरांचा सन्मान केला. शहाजी पवार व मल्लिकार्जुन पाटील यांचा सन्मान सुरू असताना पाटील म्हणाले भाऊ तेथेच थांबा मी तेथे येतो मला तुमची गरज आहे. पाटील यांच्या या वक्तव्यावर पवार मिस्कीलपणे हसले, या मला काहीच अडचण नाही पण माझी मदत हवी असेल तर तुम्हाला भाजपमध्ये यावे लागेल असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर दोघांनी मिळून एकत्र फोटो काढले व एकमेकांना हस्तोलंदन करून आपल्या मार्गावर परतले.
कुंभारीचे ग्रामदैवत श्री गेनसिद्ध मंदिरात आज हा किस्सा घडला असला तरी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मल्लिकार्जुन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. ते मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे ते काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभारणार याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. अक्कलकोट विधानसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे या जागेचे हक्कदार असले तरी मल्लिकार्जुन पाटील त्यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून ऐनवेळी मल्लिकार्जुन पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते अशी चर्चा अक्कलकोट तालुक्यात सुरू झाली आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी मला आशीर्वाद दिला तर मी विचार करेन असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे “भाऊ’ची मदत मागणारे व श्री गेनसिद्ध यांचा आशीर्वाद घेऊन गेलेले पाटील यांचे राजकीय भवितव्य काय ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.