February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

रस्त्याचा वाद नसलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव “हे’ गाव

सोलापूर : शासनाचा नवा जीआर आला. शेतीला जायला वहिवाटीचा रस्ता नाही, मग करा तहसीलदाराकडे अर्ज.ताबडतोब तहसीलदार तुमच्या शेतात येऊन रस्त्याची सोय करतील. अशा बातम्या तुम्ही वारंवार सोशल मीडियावर वाचत असाल. त्यामुळे तुम्हालाही वाटले असेल हे आता खूप सोपे झाले आहे. पण प्रत्यक्षात शेतीच्या रस्त्याचे कितीतरी तंटे आहेत, तहसीलदार सहजासहजी तुमच्या शेतात येऊन हे तंटे सोडवले तर नवल वाटायला नको. पण सोलापूर जिल्ह्यात असे एक गाव आहे की या गावात रस्त्याचा एकही तंटा नाही. होय, तुम्हाला ऐकून नवल वाटेल. येथे येऊन तहसीलदाराने रस्त्याचे तंटे सोडवले नाहीत तर इथे चालते “काका’ची न्यायपंचायत.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम उर्फ काका साठे यांचे नाव तर तुम्हाला माहिती असेलच. ते मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावचे रहिवासी आहेत. त्यांनी  या गावच्या सरपंचापासून आपल्या राजकारणाची सुरुवात करताना गावचा सर्वांगीण विकास केला. शासनाची एकही योजना नाही की ती या गावात राबविलेली नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक अजूनही स्वतः “काका’च करतात. त्यांच्या गावात व शिवारात रस्त्याचा एकही तंटा नाही, हे येथे उल्लेखनीय. काकांची दररोज सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायतीत न्यायपंचायत असते. वडाळा पंचक्रोशीतील पिढीतांचे न्याय केले जातात. त्यामुळे घरातील, आपसातील छोटी भांडणे पोलीस ठाणे, न्यायालयापर्यंत जातच नाहीत. गरिबांचा न्याय काकाच करतात. त्यामुळे त्यांच्या न्यायपंचायतीवर उत्तर सोलापूर तालुका नव्हे तर मोहोळ, तुळजापूर तालुक्यातील अनेक लोक विश्वास ठेवून न्याय मागण्यासाठी येतात. त्यामुळे काका गरीबाचे तारणहार बनले आहेत.

दोघा ज्येष्ठांची भूमिका…

काकांच्या पंचायतीत एखादा वाद आला तर त्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी गावातील दोघा ज्येष्ठ पंचाची काकांनी निवड केली आहे. हे पंच संबंधितांपर्यंत पोहोचतात व खरी परिस्थिती काय आहे हे जाणून घेतात. वस्तुस्थिती वरून दोन्ही गटाचा समझोता करून जागेवरच तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. जर जागेवर वाद मिटला नाही तर ते प्रकरण काकाच्या न्यायपंचायतीत येते. त्या दोघा ज्येष्ठ पंचाकडून वस्तूस्थिती जाणून घेऊन काका जागेवरच न्याय करतात. काकाच्या या न्याय पंचायतीमुळे अनेक गरिबांना न्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तर होतेच शिवाय पैसा वेळ व पिळवणूक टाळली जाते. वादाचा समझोता करताना जर गरज भासली तर काका पोलीस व महसूल अधिकाऱ्यांचेही मदत घेतात व त्यांना कायद्यान्वये मार्ग काढण्याची सूचना करतात. अशा प्रकरणात काका स्वतः त्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन पाठपुरावा करतात व गरिबाला विनात्रास न्याय मिळवून देतात. त्यामुळे अनेक क्लिष्ट प्रकरणे कोर्टात नेण्यापूर्वी वकील मंडळीही काकाकडे येऊन सल्लामसलत करून जातात. आत्तापर्यंत या न्यायपंचायतीत काकांनी अनेकांना न्याय देऊन त्यांचे जीवन सुखकर केले आहे.

पाच मिनिटात पडदा…

ही अनोखी न्याय पंचायत पाहण्यासाठी काकांनी ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे यांना शनिवारी निमंत्रित केले होते. पंधरा वर्षे क्राईम रिपोर्टिंग करताना जिल्हा न्यायालयातील अनेक खटल्यांचा निवाडा राजकुमार सारोळे यांनी अनुभवला आहे. पण वडाळा ग्रामपंचायतीत चालणारी काकांची अनोखी न्यायपंचायत काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठ मंडळीचे ऐकणारे अजूनही आहेत. काकांच्या शब्दांचा प्रत्येकाला विश्वास वाटतो. काकांच्या न्याय पंचायतीत झालेल्या निवड्यावर पुन्हा तंटा निर्माण होत नाही हे विशेष. शुक्रवारी काकांकडे तुळजापूर तालुक्यातील नवरा बायकोचे भांडण मिटवण्यासाठी आले होते. यावेळी मुलीकडच्या माहेरच्यांनी तिच्या नवऱ्याच्या वागण्यावरून आक्षेप घेत बराच तणाव निर्माण केला होता. पण काकांनी मध्य मार्ग काढत तिच्या नवऱ्याला ताळ्यावर आणण्याचे आश्वासन दिले. शनिवारी तिचा नवरा काकांच्या न्यायपंचायतीत हजर झाला. काकांनी आपल्या शब्दात त्याला समज दिली. संसाराचा गाडा  चालविताना नवरा- बायकोने कसे वागले पाहिजे याचा कानमंत्र त्यांनी दिला. यावेळी तिच्या पतीला त्याची जबाबदारी त्यांनी समजावून सांगितली. माझी बायको भांडते असे त्याने तक्रार केल्यावर मी तिलाही समजावतो पण यापुढे तू चांगलं वाटलं पाहिजेस तरच ती नांदायला येणार आहे. मागचं सोडून दे आता नव्याने संसार कर असा सल्ला दिला. त्यानंतर घडल्या प्रकाराची माफी मागून तो नवरदेव बायकोला चांगले नांदविण्याचे आश्वासन देऊन मार्गस्थ झाला. त्यानंतर वांगी गावातील ग्रामस्थ आले होते. या गावातील एका ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला आहे.  त्यामुळे बाजूच्या शेतकऱ्याचा रस्ता बंद झाला आहे. ओढ्याच्या बाजूचा शेतकरी त्यांना ये जा करण्यास प्रतिबंध करत आहे, अशी कैफियत होती. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी उत्तर तहसीलकडे तक्रार केली आहे पण तहसीलदार आलेच नाहीत अशी तक्रार करण्यात आली. त्यावर काकांनी संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून त्या शेतकऱ्यांना रस्ता काढून देण्याची विनंती केली. आता ओढ्यात पाणी आहे मग या शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरने जावे का असा सवाल त्यांनी तहसीलदारांना केला. तुमच्याकडून प्रश्न सुटत नसेल तर मला कलेक्टरकडे जावे लागेल असेही त्यांनी सुनावले.

मला मिळते समाधान…

काकांचा हा दररोजचा दिनक्रम आहे. सकाळी घरातून निघाल्यावर ते पहिल्यांदा ग्रामपंचायतीत येतात. तेथे आलेल्या लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून गावात फेरफटका मारून मग ते सोलापूरकडे मार्गस्थ होतात. सोलापूर जिल्हा परिषदेत आल्यानंतर आपल्या कक्षात ते जेवण करतात. नंतर दिवसभर लोकांच्या भेटीगाठी सुरू असतात. गरीब लोकांचे तंटे मिटविल्याचे समाधान मिळते, असे ते म्हणाले. इतके वय झाले तरी लोकांच्या आशीर्वादामुळेच मी ठणठणीत आहे, त्यामुळे मी हे पुण्याचे काम करीतच राहणार, असे ते म्हणाले. सरकार दरबारी सामान्यांना लगेच न्याय मिळत नाही. त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते, याबाबत काकांना खूप संताप आहे. त्यामुळे सामोपचाराने प्रश्न मिटले तर गरिबाला जगणे सुकर होते असे त्यांचे ठाम मत आहे. काही वर्षांपूर्वी एका सावकाराने गरीब शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देऊन अव्वाच्या सव्वा आकारणी करून शेती लाटण्याचा उद्योग सुरू केला होता. बस स्टँडवरच या सावकाराला काकांनी धडा शिकवला. तेव्हापासून या गावात कोणी अशी सावकारी करत नाही. त्यामुळे गावागावात असे “काका’ निर्माण झाले तर गरिबांना जागेवरच न्याय मिळेल. लोकहो,  तुम्हीही एकदा वडाळ्याला अवश्य भेट द्या. काकांची या अनोखी न्यायपंचायत तुम्हीही अनुभवा.