झेडपीच्या सीईओकडून थेट निघाले लिपिकांच्या नियुक्तीचे आदेश
प्रशासन चालवीत होते कोण? पीए की...

सोलापूर : मावळत्या सीईओकडून थेट लिपिकांच्या नियुक्तीचे आदेश सहीनिशी निघाले आहेत. जिल्हा परिषदेच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. प्रशासन प्रमुख असताना जिल्हा परिषदेचा असा कारभार कोण चालवीत होता? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
जिल्हा परिषदेचे प्रशासन चालवण्यासाठी खास मुख्यालयासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पदभार आहे. सीईओ च्या सूचनेनंतर प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिपिकांची नियुक्ती, कारवाईचे आदेश जारी करतात. पण गेल्या वर्षभरात घडले उलटेच. थेट सीईओ यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. हे नियुक्ती करताना ना विभाग प्रमुखाचा ना प्रशासन विभागाचा अहवाल विचारात घेतला गेला.पीएच्या सांगण्यावरून थेट नियुक्तीचे आदेश निघाले असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे. केवळ लिपिकांची नियुक्ती व कारवाईची फाईलच नव्हे तर इतर अनेक फायली थेट विभाग प्रमुखांना माहिती न होताच मार्गी लागल्या असल्याचा आरोप होत आहे. भविष्यात जिल्हा परिषदेवर पदाधिकाऱ्यांचे राज्य आले तर अशा परस्पर केल्या गेलेल्या कामांची चौकशी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये बऱ्याच जणांची अडचण होणार आहे. पदाधिकारी आल्यावर काय करतील? अशी बऱ्यांच जणांची समजूत आहे. पण बेकायदेशीर घडलेल्या गोष्टींवर माजी पदाधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने “सोलापूर समाचार’ शी बोलताना सांगितले.
खातरजमा करावी…
बांधकाम विभागातील एका लिपिकाची नियुक्ती थेट कोणी केली. हा लिपिक कोणाशी संबंधित आहे. कार्यालयाबाहेरील त्या लिपिकाची मैत्री तपासण्यात यावी. यात कोणाच्या वैयक्तिक हिताविरोधात जाण्याचा प्रश्न नाही. पण कारभार कसा झाला? याची खातरजमा करण्यासाठी हे उदाहरण आहे. तपासणी केल्यावर अशी आणखी काही उदाहरणे निष्पन्न होणार आहेत.
“माध्यमिक’ मध्ये काय घडतय?
सीईओच्या पीएने माध्यमिक मध्ये कसा गोंधळ घातला याचा आपण काल उहापोह केलाच आहे. त्यामुळे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांना त्रास होत आहे. पण मी नवीन सीईओना कारभार चांगला चालला असल्याचे दाखविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार ऑनलाईन झाला अशी घोषणा करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात कार्यालयातील संगणकाची पाहणी केल्यावर संगणक केबल यंत्रणेद्वारे लॅन केले नसल्याचे दिसून आले. कारभार ऑनलाईन करायचा असेल तर कार्यालयातील सर्व संगणक यंत्रणा ऑनलाइन केबलने जोडणे आवश्यक आहे. पण बऱ्याच लिपिकांच्या टेबलवर संगणक जैसे थे दिसत आहेत. कारभार ऑनलाईन कसा झाला? हा सर्वसामान्य शिक्षकांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे नवीन सीईओ कुलदीप जंगम यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचा बारकाईने अभ्यास करून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी चांगली यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा या शिक्षण विभाग विरोधात आयुष्यात आणखी रोष वाढणार आहे.
काय आल्या प्रतिक्रिया…
“सोलापूर समाचार’ ने झेडपीच्या कारभाराविषयी नवीन सीईओना माहिती होण्यासाठी सुरू केलेल्या मालिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे. काही जणांनी ठराविक लोकांना खुश करण्यासाठी केलेला हा खटाटोप असल्याचा आरोप केला आहे. पण झेडपीच्या कारभाराविषयी उघडपणे बोलण्यास अनेकजण यापूर्वी धजावत नव्हते. यापुढील कारभार असा होऊ नये यासाठी लोकांची मते जाणून घेऊन आम्ही प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मांडत आहोत.
उद्याच्या भागात वाचा गंभीर विषय…
झेडपीच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणी भांडणे लावली?