सोलापूर : दीर्घ विश्रांतीनंतर सोलापुरात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली. या काळात उन्हाचा कडाका वाढल्याने सततच्या पावसाने जमिनीत झालेला ओलावा हटला आहे. शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर उडीद व सोयाबीनच्या काढणी व मळणी उरकण्यास सुरुवात केली आहे. बरेच शेतकरी या पिकांच्या काढणीनंतर रब्बीसाठी दुसरे पीक घेतात. त्यासाठी शेती पुढच्या पेरणीला तयारी करीत असतानाच वेळेवर पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने 20 सप्टेंबर पासून पाऊस येईल असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली होती. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत कडक ऊन होते. त्यानंतर ढग भरून आले. सायंकाळी बऱ्याच ठिकाणी रिपरीप पावसाने हजेरी लावली. सोलापुरात मात्र मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी पावसाचा जोर वाढला. दहा वाजेनंतर जुळे सोलापुरात जोरदार पाऊस झाला. सकाळी 11 वाजता तर पंधरा मिनिटे पावसाची संततधार होती. जिल्ह्यात ही काही ठिकाणी पावसाने अशीच हजेरी लावल्याचे वृत्त आहे. पित्र पंधरावडा असल्याने नवरात्रीच्या तोंडावर घरातील स्वच्छता करण्याचे काहीजण नियोजन करीत होते. अशात पावसाने हजेरी लावली आहे. दोन-चार दिवस असेच वातावरण राहिले तर मात्र लोकांची अडचण होणार आहे. सतत पडणाऱ्या पावसाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये काही काळ उघडीप दिल्यावर ऑक्टोबर हिट सारखे वातावरण होते. त्यामुळे साथीचे रोग वाढले आहेत. आता हे अचानकपणे वातावरण बदलाचा परिणाम शेती व मानवी आरोग्यावर होणार असल्याचा दावा तज्ञ मंडळीकडून केला जात आहे.