सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या 22 जुलैच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मनमानी पद्धतीने 21 प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या गटविकासाधिकारी शंकर कवितके यांना अंधारात ठेऊन केल्या आहेत. या बदल्या तातडीने रद्द कराव्यात अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा  मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला.

विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा गैरवापर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत मनमानी आणि नियमबाह्य पद्धतीने कामकाज अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांचे सुरू आहे.10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या आणि दोन शिक्षक कार्यरत असलेल्या शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाचे तात्पुरते समायोजन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दि.22 जुलै 2024चे आदेश डावलून गटविकासाधिकारी यांना अंधारात ठेवून नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप संघटनेच्यावतीने यावेळी करण्यात आला.जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यात नियमानुसार कामकाज चालत असून त्याला अक्कलकोट तालुका मात्र अपवाद असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले.नियमबाह्य कामकाज करणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांचा पदभार तातडीने काढून घेण्यात यावा.तसेच नियमबाह्य बदल्या करणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी मागासवर्गीय संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्यनेते अंकुश काळे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज.मोरे,सोलापूर जिल्हा शिक्षक संघ शिवाजीराव गटाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड,महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्यनेते अनिल कादे,माजी पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,जिल्हानेते विकास उकिरडे,जिल्हानेते बाबा शेख,राजन ढवण,उम्मीद सय्यद यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *