सोलापूर : माजी महापौर शोभाताई बनशेट्टी व माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवारी सकाळी बाळे येथील राजेश्वरीनगरात मयतीसाठी एका तासात रस्ता करण्यात आला.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास बाळे येथे राजेश्वरी नगर या परिसरात एका कुटुंबात एका व्यक्तीचे दुःखद निधन झाले होते. गुरुवारच्या पावसामुळे त्यांच्या घरासमोरून साधारण एक किलोमीटर पर्यंत भरपूर पाणी रस्त्यावरती साठले असल्याने मयत कुठून घेऊन जावी हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता. सदरचा रस्ता हा गेल्या वीस वर्षापासून केला गेला नसल्याने तेथील नागरिक हैराण झाले होते. अनेक नेते, पुढारी, नगरसेवक आमदार, खासदार यांच्याकडे हेलपाटे मारून झाले. तरीसुद्धा हा रस्ता झाला नाही. शेवटी त्यांनी माजी महापौर सौ शोभाताई बनशेट्टी आणि माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांना भल्या पहाटे फोन केला. या दोघांनी तातडीने दखल घेऊन झोन अधिकारी, इंजिनीयर यांना संबंधित कामाच्या सूचना देऊन डागडुजी करून घेतली. माजी महापौर आणि माजी पक्षनेता या दोघांनी एकत्र येऊन सोलापुरातल्या समस्यांची पाहणी करून त्या समस्यांचे निराकरण करण्याची ही अनोखी सुरुवात बाळ्यातून सुरू झाली आहे. या दोघांची दिल जमाई घडवल्यामुळे हा चमत्कार झाला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. भाजपातील असे अनेक दिग्गज कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊ नयेत यासाठी मोठी खेळी खेळली गेल्याचे या निमित्ताने चर्चिले जात आहे. जर भाजपातील काम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्यांनी आता अज्ञातवास पत्करला आहे, या सर्वांनी बाहेर येऊन, एकजूट होऊन सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचे ठरवले तर सोलापुरातून भाजपाला कोणीही पराभूत करू शकणार नाही अशी आशा भारतीय जनता पार्टी प्रेमी असलेले नागरिक करीत आहेत.