सोलापूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतून सोलापुरात निवड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना गेल्या दोन महिन्यातून मानधन न मिळाल्याने अनेकजण काम सोडून जात आहेत. जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या युवकानी मंगळवारी दुपारी मानधनासाठी ठिय्या मारला.
शासनाने या योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेसाठी नाव नोंदणी वेबसाईटवर सुरू करण्यात आली. पण वेबसाईट सर्वर डाऊन असल्यामुळे बंद असल्यामुळे अनेक सुशिक्षित इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी शासकीय कार्यालयात जाऊन अर्ज केले. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय कार्यालयाने विविध विभागात नियुक्ती दिली. ऑक्टोबर अखेर या नियुक्तीला दोन महिने पूर्ण होत आहेत. मावळत्या सरकारने या योजनेतील प्रशिक्षणार्थींना मानधन देण्यासाठी निधीची तरतूद करून प्रत्येक जिल्ह्याला ही रक्कम वर्ग केली आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षावर देण्यात आली आहे. पण या विभागाने मानधन वाटप करण्यासाठी संबंधित यंत्रणेच्या खात्यावर रक्कम जमा न केल्याने अनेक जण काम सोडून जात आहेत. काम सोडून गेलेल्यांच्या ठिकाणी काम मिळावे म्हणून दुसऱ्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आता आचारसंहितेचा अंमल असल्यामुळे नवीन नियुक्ती देता येत नाही असे सांगण्यात आले. दिवाळीचा सण तोंडावर आहे. मानधन देण्यास काहीच अडचण नाही. पण कौशल्य विभागाकडून मानधन वितरित करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काम करणाऱ्या बेरोजगारांनी केला आहे.