
सोलापूर : करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचे राजकीय भवितव्य अधांतरी झाले आहे. या मतदारसंघात दारुण पराभव झाल्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार? याची चिंता कार्यकर्त्यांना लागली आहे. यासाठी एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते अजितदादा पवार यांना केलेला फोन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यापूर्वी करमाळा मतदार संघातून अपक्ष आमदार राहिलेले संजयमामा शिंदे यांचे यापूर्वी राज्यात चांगलेच वजन होते. सोलापूर जिल्हा परिषद व महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांनी चांगलाच जम बसविला होता. त्यामुळे याही वेळेस त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. पण या वेळेस त्यांना मोठे अपयश आले. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे आता संजयमामा यांना राजकीय भवितव्य काय याची चिंता कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे विधानसभा निवडणुकीत राज्यातील बऱ्याच दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजीतसिंह शिंदे, अक्कलकोटचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांना या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. संजयमामा शिंदे यांचे राजकीय भवितव्य अबाधित राहावे म्हणून एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा यांना फोन केला. या या कार्यकर्त्यांनी अजित दादांना संजयमामाचे पुनर्वसन करण्याची विनंती केली आहे. विधान परिषदेच्या सहा जागा आहेत. त्यात संजयमामांची वर्णी लागावी अशीही त्या कार्यकर्त्याने विनंती केली आहे. त्यावर अजितदादांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. माझ्याकडे आता कोणत्याच जागा शिल्लक नाहीत. मी त्यावेळेस संजय मामांना राष्ट्रवादीचे तिकीट घ्या असे सांगितले होते. त्यावर त्या कार्यकर्त्याने यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला बारामतीला भेटायला वेळ द्या अशी मागणी केली आहे. त्यावर अजितदादांनी आता माझा नाईलाज आहे. मी दिल्लीला चाललो आहे असे सांगून कॉल कट केला आहे. त्यामुळे संजयमामाचे आता राजकीय भवितव्य काय अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.