सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अभियंत्याच्या घरासह तीन बंद घराचा कुलूप कोयंडा कापून चोरट्याने रोख रकमेची चोरी केल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घबराट उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या दक्षिण सोलापूर तालुका पाणीपुरवठा विभागातील उप अभियंता सुनील कटकधोंड सोलापूर येथे राहतात. नान्नज येथे त्यांची शेती असल्याने गावातील घरात ते सुट्टीदिवशी राहावयास जातात. सध्या शेतीत गावाची लागवड करायची असल्याने शेती कामासाठी त्यांनी गावातील घरात कपाटात पैसे ठेवले होते. शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कुलूप कोयंडा कापून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट पडून त्यातील पंधरा हजाराची रोकड व सुटकेस मधील पन्नास हजाराची रोकड अशी 65 हजाराची रोकड चोरून नेली. दुसऱ्या दिवशी पहाटे शेजाऱ्यांनी त्यांना घर फोडल्याची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी राहणारे मारुती टोम्पे हे पत्नीसह देवदर्शनासाठी घर बंद करून गेले होते. त्यांच्याही घराचा कुलूप कोंडा कापून चोरट्याने घरातील 15 हजाराची रोकड चोरून नेली. तसेच बाजूला राहणारे संदलगी मुलाणी हे घर बंद करून परगावी गेले होते. त्यांचेही बंद घर फोडून चोरट्याने घरातील 60 हजाराची रोकड चोरून नेली. पोलीस पाटील ऋषिकेश तोडकर यांनी दिलेल्या माहितीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास हवालदार मोरे करीत आहेत.
नान्नजमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरट्याने प्रभाकर गवळी यांची मोटरसायकल चोरून नेली होती. ही मोटारसायकल मार्डी रस्त्यालगत सोडून त्यांनी पोबारा केल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे नान्नजमध्ये आदल्या दिवशीही चोऱ्या झाल्या होत्या. वडाळा गावामध्येही अशाच पद्धतीने बंद घरे फोडण्यात आली आहेत. बार्शी रस्त्यावर असलेल्या नान्नज व वडाळा या दोन गावांमध्ये चोरट्यांनी अशा पद्धतीने बंद घरे फोडून दहशत माजवली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

More Stories
सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम सर्वोत्कृष्ट सेवाकर्मी
अवैध धंदे, नुकसान भरपाई, डीपीच्या मुद्द्यावर गाजली डीपीसीची बैठक
फोंडशिरसच्या मतदान केंद्राध्यक्ष व पोलिसाला निलंबित करण्याचे आदेश