धाराशिवला मुंढे तर सोलापूरला मदने यांच्या नावाची चर्चा

सोलापूर : धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीनंतर तेथे पुन्हा तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी यावा तर सोलापूरच्या परिवहन पदाची सूत्रे पुन्हा राजेंद्र मदने यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडे दिली जावीत,असा सूर लोकांमधून निघत आहे.
धाराशीवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार घेतला असून कामकाजालाही सुरुवात केली आहे. अद्याप धाराशिवच्या कलेक्टरपदी कोणाचीही नियुक्ती झाली नाही. तुकाराम मुंढे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी असा सूर तेथील नागरिकांमधून निघत आहे. वास्तविक मुंढे हे सचिव पदाच्या दर्जावर पदोन्नतीने कार्यरत आहेत. धाराशिवसारख्या छोट्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पद आता त्यांच्याकडे येणे शक्य नाही. तरीही लोकांमधून त्यांच्यासारखा कलेक्टर जिल्ह्याला यावा, अशी मागणी होत आहे.
धाराशिवमध्ये ही चर्चा होत असतानाच सोलापूरमध्येही सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेचा विषय ऐरणीवर आला आहे. एसएमटीला पुन्हा उर्जित अवस्था आणण्यासाठी राजेंद्र मदने यांचासारखा अधिकारी पुन्हा सेवेत यावा असे येथील नागरिकांना वाटत आहे. वास्तविक राजेंद्र मदने हे सोलापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी होते. बदलीनंतर आरटीओ व सहाय्यक आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. आजारपणामुळे सध्या ते वैद्यकीय रजेवर आहेत. अद्याप सेवेत त्यांचे दीड वर्षे बाकी आहेत. शिवाय त्यांनी स्वेच्छा निवृत्तीबाबत विभागाला कळविले आहे. राजेंद्र मदने हे मूळचे बारामतीजवळील पिंपळी या गावचे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कॉलेजपासून त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी एखादी सामाजिक जबाबदारी दिली तर मदने ती पार पाडू शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे सोलापूरची परिवहन सेवा सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना गळ घातली तर परिवहनला पुन्हा ते दिवस येऊ शकतात. त्यामुळे मदने यांना रिटर्न आणण्यात राजकारण्यांनी भूमिका बजावावी अशी मागणी सोलापूरवाशियामधून होत आहे.
मनपाची परिवहन सेवा रुळावर आणलेले माजी परिवहन व्यवस्थापक राजेंद्र मदने साहेब यांनी शुक्रवारी सोलापूरला भेट दिली. मदने यांनी परिवहन सेवेला एकेकाळी उर्जीतावस्था आणली होती. गेले ते दिन गेले. आज सोलापूरची बससेवा बंद पडली आहे. खूप दु:ख होतंय. करंटे मनपा अधिकारी आणि महापालिकेचे दळभद्री माजी महापौर आणि माजी नगरसेवक. याकडे कोणीच गांभीर्याने पाहिले नाही.
शांतकुमार मोरे,
ज्येष्ठ संपादक