
सोलापूर : सोलापूर शहर पोलिस मुख्यालय येथे सुरु असलेल्या पोलिस कॅन्टीनमध्ये टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, कुलर, मायक्रो ओव्हन या इलेक्ट्रॉनिक वस्तू 10 ते 20 टक्के स्वस्तात उपलब्ध असल्याची माहिती पोलिस वेल्फेअर विभागाचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.
सोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील सबसिडीअरी पोलिस कॅन्टीन येथे जी क्युब इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य सोमवार, दि. 10 मार्चपासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या काउंटरचे उद्घाटन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजन माने, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, पोलीस वेल्फेअरचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, शरद बारावकर यांच्याहस्ते शहर पोलीस मुख्यालयातील पोलिस कॅन्टीन येथे करण्यात आले. त्यावेळी पोलिस निरीक्षक पाटील बोलत होते. यावेळी जी क्युब इलेक्ट्रॉनिक्सच्या सीईओ गुरप्रीत कौर सर्वनसिंग-डिलॉन, महिला पोलिस उपनिरीक्षक जयदेवी काळे उपस्थित होते.
सोलापूर शहर पोलिस मुख्यालयात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पोलिस कॅन्टीन सुरु असून या कॅन्टीनमधून पोलिस कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात संसारोपयोगी वस्तू मिळत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सवलतीच्या दरात मिळाव्यात, अशी मागणी होत होती. त्याचा विचार करून पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त अजित बोऱ्हाडे, सहायक आयुक्त सुरेंद्र माळाळे यांनी जी क्युब इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पोलिस कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये टीव्ही, फ्रीज,एसी,वॉशींग मशिन, ओव्हन आदी वस्तुंचा समावेश असल्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
यावेळी जी क्युब इलेक्ट्रॉनिक्सच्या सीईओ गुरप्रीत कौर-डिलॉन यांनी राज्यातील सैन्य दलात तसेच पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळाव्यात म्हणून विविध ठिकाणच्या मिलीटरी आणि पोलिस कॅन्टीनमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. गतवर्षी एप्रिल महिन्यात सोलापुरात विजापूर नाका येथील भारतीय माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयात ही सोय करण्यात आली आहे. आता शहर पोलिस कॅन्टीनमध्ये ही सोय करण्यात आल्याने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सवलतीत या वस्तू मिळणार असून त्यांची देखभाल व दुरूस्तीची सोय देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कमांडर अशोककुमार मनचंदाना यांनी केले तर आभार सोलापूर येथील जी क्यूबचे व्यवस्थापक प्रमोद माढे यांनी मानले. यावेळी पोलीस कॅन्टीनचे व्यवस्थापक फुटाणे यांच्यासह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फक्त भारतीय सैन्य दलातील आजी व माजी सैनिक, सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस, एसआरपी जवानासाठी सवलतीच्या दरात या वस्तू मिळणार आहेत. यासाठी फायनान्सची सोयही या ठिकाणी करण्यात आली आहे.