December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

जागतिक जलदिनी सोलापूर जिल्ह्यात होणार मोठा जागर

सोलापूर : जागतिक जल दिनानिमित्त शनिवार दि.२२ मार्च रोजी जिल्हयात सर्व तालुका व ग्रामपंचायतस्तरावर जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचे महत्त्व, वापर, हाताळणी याबाबत जनजागृती व्हावी, याकरीता शालेय विदयार्थी यांची स्वच्छता फेरी, गावकरी सहभागाने स्वच्छता दिंडी, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची परिसर स्वच्छता करणे, स्त्रोतांची क्लोरिनेशन प्रात्यक्षिक करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, २२ मार्च रोजी दरवर्षी जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंवर्धन, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे शुध्दीकरण व स्वच्छता ठेवणे , शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पिण्याच्या पाण्याची जागा, पाणी पुरवठा करणारी यंत्रणा यांची साफसफाई करणे, शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छता करणे, पाऊस पाणी संकलनासाठी नियोजन करणे तसेच पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गाव परिसरात पावसाचे वाहते पाणी अडवून जमिनीत जिरविणे राबविणे गरजेचे आहे.याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येऊन सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जलप्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.तसेच जल जीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पुढील ३० वर्षापर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध राहील तसेच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिव्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पिण्याचे शुध्द पाणी मिळेल यासाठी ग्रामस्थांसमवेत नियोजन करावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेटटी यांनी केले आहे.

635 गावात हर घर जल…

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात ६३५ इतके गावे हर घर जल झाली आहेत.सदर प्रमाणित झालेल्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन पत्र दिलेले आहेत. हे अभिनंदन पर पत्र २२ मार्च रोजीच्या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून सर्व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, उपअभियंता (ग्रा.पा.पु. विभाग ) यांच्याहस्ते सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना वितरीत करण्यात येणार आहे.

जल दिनाच्या निमित्ताने…

तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जन जागृती पर राबविण्यात येणारे उपक्रम…

● १००% वैयक्तिक नळ कनेक्शन पूर्ण होवून हर घर जल ग्रामपंचायत घोषित करण्यासाठी ग्रामपंतायतीमधील सरपंच व ग्रामसेवक व जल जीवन मिशन मध्ये समावेश असलेल्या ग्रामपंचायतीची बैठक घेवून मार्गदर्शन करावे.

● “हर घर नल से जल” या मोहीमेतंर्गत प्रत्येक तालुक्यातून किमान १० गावे घोषीत करून त्याची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणे.

● पाणी गुणवत्ता या मोहीमेतंर्गत स्वच्छता सर्वेक्षणाचे व एफटीके बाबत जैविक तपासणी मोहिम राबविणे

● शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत येथील टाक्या साफ करून घेणे तसेच वैयक्तिक नळ कनेक्शन आहे का याची खात्री करणे

● ग्रामपंचायस्तरावर पाणी व स्वच्छता समिती समवेत लोकवर्गणी व पाणीपट्टी गोळा करणे.

● वैयक्तिक नळ कनेक्शन नोंदी करणेबाबत गाव स्तरावरील आधार कार्ड गोळा करणे व ऑनलाइन करणे.

● पथनाट्य सर्व शालेय विद्यार्थी, हायस्कूल, महाविद्यालय यांचा सहभाग घेवून उपक्रम राबविणे

● कोपरा बैठका, गृहसभा, माहिती, शिक्षण व संवादपर उपक्रम राबविणे.