December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

उपसंचालक कार्यालयासमोर उपोषणानंतर शिक्षकांना मिळाला शालार्थ आयडी

सोलापूर : जिल्ह्यातील चांगदेव पाटील विद्यालय, दहिटणे ता. बार्शी येथील सहशिक्षक विक्रम काळे व भाग्यश्री साबळे यांचा शालार्थ आयडी तीन दिवसांच्या उपोषणानंतर मिळाला असल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नागटिळक यांनी दिली.

एक जानेवारी 2023 पासून शासनाने विना अनुदानित शाळांना २० टक्के टप्पा अनुदान दिले आहे. परंतु शालार्थ नसल्याने काळे व साबळे हे गेल्या तेरा वर्षापासून वेतनापासून वंचित होते. शालार्थ मिळण्यासाठी त्यांनी गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा केला होता, परंतु उपसंचालक कार्यालयाने त्रुटी काढल्याने त्यांचा शालार्थ रखडला होता.

शालार्थ मिळावा या मागणीसाठी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने उपसंचालक कार्यालय, पुणे येथे १८ मार्चपासून सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरु केले होते. उन्हातील या तीव्र आंदोलनाची दाखल घेवून अखेर तीन दिवसानी सर्व कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करून मूळ कागदपत्रे, रोस्टर पाहून त्याना शालार्थ देण्यात आला. शालार्थ मिळाल्याने त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वेतन मिळणार असल्याने त्यांचा तेरा वर्षाचा वनवास संपला असल्याची भावना काळे व साबळे यांनी व्यक्त केली.

यासाठी वरिष्ठ लिपिक मयूर प्रधान, शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, उपसंचालक हारून आतार यांनी सहकार्य केल्याचे नागनाथ साबळे यांनी सांगितले.प्रहार शिक्षक संघटनेच्या उपोषणात जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक, विक्रम काळे, कोमल काळे त्यांची मुले, नागनाथ साबळे, सोमशेखर केशेट्टी, निलेश माने, मालकप्पा ढब्बे यांनी सहभाग घेतला.