April 19, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग ई ऑफिस प्रणालीत राज्यात नंबर वन

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात ई ऑफिस कार्य प्रणालीत सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग अव्वल ठरला आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे कौतुक केले आहे. कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व गतिमानता वाढविण्यासाठी एक मे पासून माध्यमिक शिक्षण विभागात कोणतीही फाईल स्वीकारली जाणार नसून ईमेलवरूनच सर्व प्रस्ताव घेतले जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.

सर्व शासकीय कार्यालयाचा कारभार गतिमान करण्यासाठी ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करा, असे शासनाने आदेश दिले आहेत. जानेवारी 2025 पासून जिल्हा परिषदेत ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे विभागाकडून कामकाज होत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 22 एप्रिल रोजी परिपत्रक काढून सर्व विभागांना ई ऑफिस कार्यप्रणालीचे कामकाज वाढविण्याचे आदेश दिले आहेत. ई ऑफिस कार्यप्रणाली प्रभावीपणे राबविल्याने प्रशासनात गतिमानता येणार आहे. प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पारदर्शक व कामकाजात सुसूत्रता, दस्तऐवज व माहिती सुरक्षित, त्वरेने प्राप्त होऊन, निर्णय प्रक्रिया सुलभ होऊन प्रकरणे निकालीत काढण्यास गतिमानता येणार आहे. त्यामुळे ई-मेलचा वापर करून ई ऑफीस कार्य प्रणालीचा वापर सक्तीने करण्यात यावा. पत्रव्यवहार, सर्व प्रकरणे, विकास कामे, देयके, वैद्यकीय बिले, सेवा पुस्तके, नसती या सर्व बाबी ई ऑफिस कार्यप्रणालीत नोंद झाल्यानंतरच स्वीकारण्यात याव्यात, असे सीईओ कुलदीप जंगम यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

जिल्हा परिषदेने अवलंबलेल्या ई ऑफिस कार्यप्रणालीत शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा प्राथमिक शिक्षण विभाग अव्वल ठरला आहे. त्यानंतर लघुपाटबंधारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचा  सामान्य प्रशासन विभाग, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा माध्यमिक शिक्षण विभाग, डॉ. संतोष नवले यांचा आरोग्य विभाग, त्यानंतर कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचा ग्रामीण पाणीपुरवठा, इशाधीन शेळके यांचा ग्रामपंचायत विभाग, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचा बांधकाम विभाग क्र.दोन, डॉ. नवनाथ नरळे यांचा पशुसंवर्धन आणि दहाव्या क्रमांकावर कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांचा बांधकाम विभाग क्र. एक या कार्यालयाचा नंबर लागत आहे. जानेवारीपासून उद्दिष्टाप्रमाणे कामकाज पाहिल्यास सामान्य प्रशासन पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे.

  •  राज्यात 29 वा क्रमांक 

ई ऑफिस प्रणाली राबविण्यात सोलापूर झेडपी राज्यात 29 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर सांगली, दुसऱ्या क्रमांकावर नाशिक, तर तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा परिषद आहे तर टॉप टेनमध्ये धुळे, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, धाराशिव, वर्धा या जिल्हा परिषद आहेत. 11 पंचायत समितीचे कामकाज झिरो दिसत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा क्रमांक पिछाडीवर गेला आहे. पंचायत समितीकडे स्कॅन करणारी यंत्रणा नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

शिक्षणाधिकारी जगताप यांचे कौतुक..

राज्यभरातील माध्यमिक शिक्षण विभागाने ई ऑफिस कार्यप्रणालीवर अद्याप कामकाज सुरू केले नसल्याचे दिसून आले आहे. सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाने यात बाजी मारली आहे. सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग ई ऑफिस कार्यप्रणालीत जिल्हा परिषद स्तरावर चौथ्या क्रमांकावर तर राज्यात अग्रस्थानी असल्याचे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांच्या निदर्शनाला आणून दिल्यावर त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे कौतुक केले आहे. सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाप्रमाणे इतर जिल्ह्यातील विभागाने कार्यवाही करावी, अशी त्यांनी सूचना केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार या कार्यात अधिक गती येण्यासाठी एक मे पासून माध्यमिक शिक्षण विभाग सर्वच फायली ई प्रणालीत स्वीकारणार असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.