February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

18 वर्षानंतर सोलापूर झेडपी सभागृहाचा लुक बदलला

सोलापूर  : अत्यंत कमी खर्चात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तब्बल 18 वर्षानंतर दुसऱ्यांदा सभागृहाचा लुक बदलला असून प्रवेशद्वाराच्या पोर्चमधील वारी, सिद्धेश्वर यात्रा आणि समृद्ध गावाचे छायाचित्र लक्षवेधी ठरले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचा अंतर्गत लूक बदलला आहे. जिल्हा परिषदेतील अंतर्गत सिमेंटचे रस्ते, पार्किंग आणि समोरच्या बागेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये बाग मोकळी करण्यात आली असून त्यावर हिरवळीचा गालिचा अंथरण्यात आला आहे. हा गालीचा कायम हिरवा राहण्यासाठी बागेत स्प्रिंकलर सिस्टीम बसवण्यात आली आहे. हिरवळ वाढवण्यासाठी बागेत काही नवीन रोपे लावण्यात आली आहेत. यापूर्वी बागेला तारेचे कुंपण होते ते काढून टाकण्यात आले आहे. बागेच्या शेजारून वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्य इमारतीतील आतील भागाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.  नव्याने दिवे व फरशा बसविण्यात आल्या आहेत. अंतर्गत कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुख्य इमारतीच्या दगडी भिंतीवर यापूर्वी बसविण्यात आलेले अल्युमिनियमच्या रेलिंगमध्ये काचा होत्या. त्या काढून आता खिडक्या करण्यात आल्या आहेत. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातील इमारतीतील कार्यालयामधील वातावरणात फरक पडला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार बदलण्यात आले असून बाजूचे रेलिंग, दिव्यांग ट्रॅकचे काम करण्यात आले आहे. पोर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी बाकडे टाकण्यात आले असून थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. झेडपीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील रस्त्यावर इमारतीतील कार्यालयाची ओळख सांगणारे फलक पहिल्यांदाच बसविण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत दुसऱ्या मजल्यावर सभागृह आहे. 29 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 मार्च 1994 रोजी या सभागृहाचे उद्घाटन तत्कालीन अध्यक्ष स्व. प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्याहस्ते करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय भाटिया हे कार्यरत होते तर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष कौरव माने, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती आदिनाथ राजे- भोसले, कृषी सभापती बळीराम साठे, समाज कल्याण सभापती सुरेश आगवणे, महिला व बालकल्याण सभापती सुशीला बरबडे, पक्षनेता बबनराव शिंदे तर विरोधी पक्षनेते म्हणून वसंतराव पाटील हे कार्यरत होते.

त्यानंतर 6 ऑगस्ट 2007 रोजी या सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक बचत भवन सभागृह नूतनीकरणाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली माजी ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुमन नेतराव या होत्या तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दिलीप जाधव व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारत शेंडगे हे कार्यरत होते. या काळात जिल्हा परिषदेला आयएसओ हे मानांकन मिळाले होते. त्यानंतर तब्बल 18 वर्षानंतर आता या सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वास्तविक या सभागृहातील खुर्च्या व साऊंड सिस्टिम यापूर्वी बदलण्यात आली आहे. या सभागृहाच्या दोन्ही जिन्याच्या दरवाज्याला वाळविने पोखरण्यास सुरुवात केली होती. स्वच्छताग्रहाची दुरावस्था व सभागृहातील काही वस्तू तुटल्यामुळे आवाजाची समस्या येत होती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सभागृह व जिल्हा परिषद परिसराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. सभागृह नूतनीकरणासाठी 30 लाखाची तरतूद केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शाखा अभियंता सोनकांबळे, स्थापत्य अभियंता चेतन वाघमारे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू झाले. सभागृहातील जुनाट वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त करण्यात आली व काही नवीन यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहाचा थंडावा वाढला आहे.वाळवी लागलेले फर्निचर काढून टाकण्यात आले आहे व त्या ठिकाणी नवीन काम करण्यात आले आहे. रंगरंगोटी व तुटलेले साहित्य काढून टाकण्यात आले आहे. सभागृहात यापूर्वी प्रोजेक्टर होता. त्याऐवजी आता दोन नवीन टच स्क्रीन बसविण्यात आले आहेत. सभेतील विषय पत्रिका व इतर प्रोजेक्ट, लाईव्ह प्रोग्रॅम दाखवणे आता सहज शक्य होणार आहे.

सभागृहात पोर्चमध्ये सर्वात लक्षवेधी काम झाले आहे. पोर्चच्या दोन्ही भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. अजून हे काम सुरु आहे. सभागृहाकडे जात असताना पोर्चच्या डाव्या बाजूला पंढरीच्या वाटेवर असलेले पताका घेतलेले वारकरी समोर दिसतात. त्यानंतर नंदीध्वज घेऊन निघालेल्या सिद्धेश्वर भक्तांचे दर्शन होते. उजव्या बाजूला गावातील बसस्थानक, सायकलवरून शाळेकडे निघालेला विद्यार्थी, गावातील बाजारपेठ, पाणीपुरवठा करणारी टाकी, हिरवी झाडे व वरून फिरणारे पक्षी असे समृद्ध गावाचे चित्रीकरण दिसते. प्रवेशद्वारावरील या दोन्ही भिंतीवरून जिल्हा परिषदेचे विकासात्मक दृष्टी सर्वांच्या नजरेत भरते. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या संकल्पनेतून ही चित्रे साकारण्यात आली आहेत. आणखी काही थोडी कामे शिल्लक आहेत. त्यानंतर ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते या नूतनीकरण कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात येत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले.