सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेला नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये महिलांमध्ये वाढते कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेऊन किशोरवयीन मुलींसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस देणे व ग्रामपंचायतीवर सौर ऊर्जा संयंत्र बसवण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मार्चअखेर खर्चाचे नियोजन संपत आले आहे. खर्च झालेल्या निधीचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे या घेत आहेत. मार्चअखेर या वेळेस जिल्हा परिषदेसाठी विशेष निधी देण्यात आला आहे. यामध्ये शाळा सुधारणा, आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागाचा समावेश आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट व ब्लड कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महिलांची आरोग्य तपासणी शिबिर राबवले होते. या शिबिरात ही गंभीर बाब आढळून आली होती. लक्षणे आढळलेल्या महिलांना उपचारासंबंधी सुविधा देण्यात आली होती. महिलांच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी बाजारात लस उपलब्ध झाली आहे. किशोरवयीन मुलींना ही लस दिली जाते. बाजारात या लसीची किंमत दोन ते अडीच हजार रुपये आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळकरी किशोरवयीन मुलींना ही लस मोफत देण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्रातील हा पायलट प्रोजेक्ट असेल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या नाविन्यपूर्ण योजनेसाठी सुमारे एक कोटी निधी मंजूर केला आहे. आरोग्य विभागाची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या या नावीन्यपूर्ण योजनेमुळे भविष्यातील कॅन्सरवर प्रतिबंध होणार आहे.
त्याचबरोबर ग्रामपंचायतीवर सौर ऊर्जा संयंत्र बसविण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायत साठी सौर ऊर्जा संयंत्र बसवण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. त्याचबरोबर शाळांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठीही विशेष निधी मिळाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन आर्थिक वर्षात या तीन नाविन्यपूर्ण योजनाना गती मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कृषी विभागासाठी अकरा तालुक्यात 50 टक्के अनुदानावर शेतकरी गटासाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचे योजना जाहीर केली आहे. या योजनेचे कौतुक झाल्यानंतर आता जिल्हा नियोजन मधून यातील नाविन्यपूर्ण योजनांसाठी विशेष निधी मिळाला असल्याने झेडपीच्या विकास कामांना गती येणार आहे.