April 14, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर मनपा शिक्षण मंडळात दहा वर्षांनी मिळाली अनुकंपा नोकरी

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेली अनुकंपा भरती चर्चेत असतानाच सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळावर प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्त झालेले विठ्ठल ढेपे यांनी दहा वर्षापासून लटकलेली अनुकंपा भरतीची प्रक्रिया मार्गी लावली आहे.

सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडे महापालिकेच्या स्वतःच्या 57 व यासह इतर 390 खाजगी प्राथमिक शाळांचा कारभार येतो. माध्यमिक शिक्षण विभागाकडील उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार आला आहे. पदभार घेतल्याबरोबर त्यांनी शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. पदभार घेतल्याबरोबर त्यांनी अनुकंपा भरतीच्या फाईली ओपन केल्या. त्यात एक अनुकंपा त्यांच्या कौटुंबिक वादामुळे दहा वर्षापासून लटकली होती. हा प्रश्न त्यांनी निकालीत काढला. तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या इतर दोन अनुकंपा भरती मार्गी लावण्यात आल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली इतर कामेही हातोहात मार्गी लावण्यात आले आहेत. त्यामुळे मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या फायलींचा ढिगारा उपासला गेला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी थेट प्रशासन अधिकाऱ्यांना भेटता येणे शक्य झाले आहे.

इ ऑफिस प्रणालीअंतर्गत मनपा शिक्षण मंडळाचा आता कारभार सुरू करण्यात आला आहे. इको क्लबअंतर्गत शंभर टक्के नोंदणी करण्यात आली आहे. “एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरात 35 हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. जिल्ह्यात एक लाख दहा हजार वृक्षारोपण झाले आहे त्यात मनपाचा हिस्सा मोठा आहे. दररोज शिक्षकांच्या बैठका घेऊन सर्व उपक्रम 100% यशस्वी करण्यावर भर देण्यात आला आहे.

बांधकामासाठी निधी अपुरा…

मनपाच्या 57 शाळा पैकी काही शाळांच्या इमारती दुरुस्तीला आल्या आहेत. पण महापालिका व जिल्हा नियोजनमधून या शाळांच्या दुरुस्तीला निधी मिळत नाही. वास्तविक महापालिका कर वसुलीत शिक्षण कराचा समावेश करते. पण जमा झालेला हा कर शिक्षण विभागाला मिळत नसल्याची तक्रार आहे. आयुक्तांनी या समस्येत लक्ष घालून शिक्षण करातून स्मार्ट शाळा तयार करणे व शाळांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.