March 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बँकेचे कर्ज, उस बिल न मिळाल्याने नागूरच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील नागूर येथील सुनील कुंभार या 28 वर्षीय युवा शेतकऱ्याने उसाचे थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील नागुर येथील सुनील चिवडाप्पा कुंभार (वय: 28) या तरुण शेतकऱ्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर यांच्याकडील थकीत ऊस बिल आणि मैंदर्गी येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी त्याने विषारी द्रव्य प्राशन केले होते. यामुळे त्रास होऊ लागल्यावर त्यांना सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात उसाच्या बिलाचा उल्लेख असून ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत असे नमूद केले आहे. त्यांच्या नातेवाईकांनी शिवविच्छेदनासाठी त्यांचे प्रेत शासकीय रुग्णालय येथे हलविले आहे. सुनील कुंभार यांच्या पश्चात वयोवृद्ध आई- वडील, दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे. घरातील करता युवकच गेल्याने कुंभार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुनील हे आई-वडिलांना एकुलते चिरंजीव होते. आई मानसिक आजाराने त्रस्त आहे तर वडिलांना वयोमानाने काम जमत नाही. त्यामुळे घरची जबाबदारी सुनील यांच्यावर होती.दरम्यान ही घटना समजतात धोत्री येथील गोकुळ शुगरच्या अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालय येथे नातेवागाची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. नातेवाईकांनीही संबंधित कारखाना आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत सुनीलचे प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.