January 14, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आयएएस कुलदीप जंगम यांची मुत्सद्देगिरी; आंदोलनाचे 21 दिवस संयमाने हाताळले

  • सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची मुत्सद्देगिरी पुन्हा चर्चेत आली आहे. ग्रामसेवक, गुरुजी, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्या आंदोलनामुळे प्रशासनावर ताण आलेला असतानाच सीईओ जंगम यांनी सर्वांचे प्रश्न कुशलतेने हाताळल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गेले 21 दिवस विविध प्रश्नांवर आंदोलन केले. 19 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासन व ग्रामसेवक यांच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेने प्रश्न ताणून धरल्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला होता. हा प्रश्न सीईओ कुलदीप जंगम यांनी अत्यंत संयमाने हाताळला. ग्रामसेवक संघटनेच्या मागण्या मान्य करीत ग्रामपंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी झेड.ए. शेख यांचा अतिरिक्त पदभार त्यांनी काढला. हे आंदोलन संपते न तोच हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्यामुळे टीईटीच्या प्रश्नासाठी शिक्षकांनी आंदोलन केले. त्यानंतर आशा वर्कर, एन. आर. एच. मधील कर्मचारी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांची आंदोलने झाली. ही आंदोलने संपतात तोच आर्वी पंचायत समितीमधील बीडीओना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ पंचायत समितीतील बीडीओंनी असहकार आंदोलन सुरू केले. जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गेली 21 दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा ताण आला. पण सर्व आंदोलने सीईओ जंगम यांनी व्यवस्थितपणे हाताळली. अधिवेशन सुरू असतानाचे कामकाजाचा ताण असतानाच या आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले. अशा विविध आंदोलनातून बाहेर पडून जिल्हा परिषद प्रशासनाचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. सीईओ जंगम यांनी विविध विभागाच्या बैठका घेऊन कामाचा धडाका सुरू केला आहे.