सोलापूर : उत्तर प्रदेशातील फत्तेपूर येथील २७ वर्षीय मोहम्मद शाबरी हा तरुण चार ते पाच महिन्यांपूर्वी अत्यवस्थ अवस्थेत सोलापूर येथील सोलापूर जिल्हा रुग्णालय येथे दाखल झाला. त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक नव्हते. विशेष म्हणजे, त्याला बोलता येत नसल्यामुळे स्वतःची ओळख, पत्ता किंवा कुटुंबीयांची माहिती देणेही शक्य नव्हते.
अशा बिकट परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, ब्रदर आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर खरी माणुसकी जपत त्याची जबाबदारी स्वीकारली. रुग्ण स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असल्याने औषधोपचारांसोबतच त्याच्या आहार, स्वच्छता आणि दैनंदिन देखरेखीची विशेष काळजी घेण्यात आली. मेल वॉर्डमधील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र त्याच्यावर लक्ष ठेवत त्याला आधार दिला.
व्यवहार स्थितीत आढळलेल्या एका तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पहिल्यांदा त्याची काहीच ओळख पटली नाही.यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि सर्व वर्ग-चार (चतुर्थश्रेणी) कर्मचाऱ्यांनी एकत्रित परिश्रम घेतले. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याचे नाव निष्पन्न झाले. सातत्यपूर्ण उपचारांमुळे मोहम्मद शाबरीची प्रकृती हळूहळू सुधारू लागली.
दरम्यान उच्चारच दाखल झाल्यानंतर रुग्णाला बोलता येत नसल्याने त्याच्या घरचा पत्ता शोधणे हे मोठे आव्हान होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने हार मानली नाही. अखेर प्रकृती सुधारल्यानंतर त्याच्याकडून आवश्यक माहिती मिळवण्यात यश आले आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला.
कुटुंबासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला मुलगा पुन्हा सापडेल, अशी आशाही त्यांनी सोडली होती. पण सोलापूरच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांचा मुलगा पुन्हा घरी परतण्याच्या मार्गावर आला.
रुग्णाचे मामा असलम अब्दुल अतिफ सौदागर यांनी भावुक होत सांगितले,
“आमचा मुलगा पुन्हा घरी येईल, अशी आम्ही अपेक्षाच सोडली होती. पण सोलापूरमधील लोकांच्या आपुलकीमुळे आणि प्रेमामुळे तो आम्हाला परत मिळाला. आम्ही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आयुष्यभर ऋणी राहू.”
या संपूर्ण कार्यात मेट्रन बेले, इनचार्ज जावेद खान, स्टाफनर्स सुनील हांडे, गोपीनाथ दळवे, अक्षय जाधव आणि श्रुती अष्टगी यांचे विशेष योगदान राहिले.
सरकारी रुग्णालयांबाबत अनेकदा नकारात्मक चर्चा होत असताना, सोलापूर जिल्हा रुग्णालयाने दाखवून दिले की ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ ही भावना आजही जिवंत आहे. एका भटकलेल्या तरुणाला नवजीवन देत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा खरा अर्थ समाजासमोर ठेवला आहे. याबद्दल सोलापूर जिल्हा रुग्णालयातील स्टाफचे कौतुक होत आहे.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की