सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे दावेदार कोण याची चर्चा होत असतानाच विषय समिती सभापती पदासाठी पंढरपूर तालुक्यातील परिचारक गटाच्या आदिनाथ देशमुख यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याच बरोबरीने जिल्हा परिषदेतील दहा विषय समिती सभापती पदाची निवड होणार आहे. महिला बालकल्याण, शिक्षण व आरोग्य आणि त्याचबरोबर समाजकल्याण, कृषी समिती सभापतीची मागणी जास्त आहे. महिला बालकल्याण साठी करमाळ्याच्या बागल तर समाज कल्याणसाठी माळशिरसच्या संस्कृती सातपुते यांची नावे आघाडीवर आहेत. आता शिक्षण व आरोग्य समिती सभापतीसाठी पंढरपूर तालुक्यातून परिचारक गटाचे आदिनाथ देशमुख यांचे नाव आघाडीवर चर्चिले जात आहे. आदिनाथ देशमुख हे राजकारणातील अनुभवी मानले जातात. करकंब गटातून 1116 मताची आघाडी घेऊन ते निवडून आले आहेत. यापूर्वी चार वेळा करकंब ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी लढवली आहे. वीस वर्षे सक्रिय राजकारणात असताना एक वेळा सरपंच दोन वेळा उपसरपंच आणि एक वेळा सदस्य असे त्यांनी गावचा कारभार पाहिला आहे. राज्याच्या सरपंच परिषदेचेही ते अध्यक्ष होते. पाचव्यांदा त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि त्यात यशस्वी झाले. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे ते खंदे समर्थक आहेत. त्याचबरोबर करकंब गट हा माढा विधानसभा मतदारसंघात येतो. आमदार बबनदादा शिंदे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ग्रामपंचायतचा कारभार यशस्वी केला आहे. या तीन आमदारांचा आशीर्वाद असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा नंबर लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे.यासाठी करकंब झेडपी गटातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

More Stories
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की
दहावीच्या परीक्षेला गलेलठ्ठ विद्यार्थी; नंदेश्वरला पकडले 10 बोगस परीक्षार्थी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात सक्षम राष्ट्र निर्मितीची क्षमता: कुलदीप जंगम