सोलापूरजिल्हा परिषद

आषाढीची तयारी : सोलापूर झेडपीला मिळाले टेंडरचे अधिकार

सोलापूर : महाराष्ट्र शासनाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या महावारीच्या तयारीला सुरुवात केली आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता सोलापूर जिल्हा परिषदेला पुणे सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील पालखी सोहळ्यातील वारकरी व्यवस्थेच्या कामाचे टेंडर काढण्याचे अधिकार दिले आहेत.

गतवर्षी पालक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी यशस्वी करण्यात आली. आषाढी वारीच्या निमित्ताने दोन्ही संतांच्या पालख्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था व आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात होणाऱ्या गरजेचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले होते. संतांच्या पालख्या पंढरपूर कडे येत असताना सातारा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची अडचण झाली होती. सोलापूर जिल्हा परिषदेच्या टीमने ऐनवेळी तेथे धाव घेऊन व्यवस्था पूर्वतत केली होती. त्यामुळे यंदाच्या वारीच्या तयारीची जबाबदारी मंत्रालयाने सोलापूर जिल्हा परिषदेवर दिली आहे. गतवर्षी वारीच्या काळात पावसाचे सावट होते. त्यामुळे ऐनवेळी उभारण्यात आलेल्या जर्मन हँगर वारकऱ्यांच्या सोयीचे ठरले. त्याचबरोबर वारकऱ्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या. सोलापूर जिल्हा परिषदेच्या टीमला व्यवस्थेची चांगलीच जाण असल्याने पालक या सोहळ्यांबरोबर काय काय व्यवस्था लागेल याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लागणाऱ्या कामाचे टेंडर काढण्याची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेवरच देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. शासनाने आषाढी वारीच्या तयारीसाठी आतापासूनच यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली आहे. आषाढी वारी अधिकाधिक सुकर करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button