April 9, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सीईओ कुलदीप जंगम यांनी केले असे काम की झेडपीच्या इतिहासात नोंद होणार

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या इतिहासातील एक खूप मोठे काम केले आहे. शहरातील मुख्य ठिकाणी असलेली सव्वा सहा एकर जागा जिल्हा परिषदेच्या नावावर होणार आहे.

सोलापूर शहरात इंग्रजांच्या काळात कलेक्टर ऑफिसची निर्मिती करण्यात आली. त्याकाळी या कलेक्टर ऑफिसच्या नावे मोठी जागा नोंद करण्यात आली. या जागेतच कालांतराने जिल्हा परिषदेची इमारत, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक, दक्षिण तहसील, मुद्रांक शुल्क, भूमी अभिलेख, जिल्हा कोषागर या कार्यालयांची निर्मिती झाली. त्यानंतर मैदानाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत प्रशासकीय इमारत, जिल्हा ग्राहक मंच, एमएसईबीचा डेपोची निर्मिती करण्यात आली. जिल्हा परिषदेची निर्मिती झाल्यानंतर बराच मोठा भाग जिल्हा परिषदेच्या इमारतींसाठी देण्यात आला व कुंपण घालण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या बाजूला कार्यालयाची निर्मिती झाली. पण जागेच्या मालकीचा प्रश्न कधीच आला नव्हता. अलीकडे जिल्हाधिकारी कार्यालय सातरस्ता येतील प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आले. पण बऱ्याच गोष्टी अजूनही आहे त्याच ठिकाणी आहे. जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अस्तित्वात असताना लोकांची आंदोलने जिल्हा परिषदेच्या गेटवर करण्यात येत होती. ती अजूनही अस्तित्वात आहेत. या आंदोलनाला आलेले लोक व जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खरेदी विक्री कार्यालयात येणाऱ्या लोकांची पार्किंगची सोय जिल्हा परिषदेत होत आहे. अलीकडच्या काळात जिल्हा परिषदेचा कारभार वाढल्याने पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी हे पार्किंग कमी पडू लागले आहे. मनीषा आव्हाळे यांच्याकडे पदभार असताना हा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांनी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक, दक्षिण तहसील, प्रशासकीय इमारत, जिल्हा कोषागार, खरेदी विक्री कार्यालयाकडे जाणाऱ्यांची अडचण झाली. याशिवाय या प्रवेशद्वारा शजारी असलेल्या हॉटेलचा धंदा बसला. त्यामुळे तक्रारी सुरू झाल्या. आव्हाळे यांनी हॉटेलचे माहिती घेतले असता हे हॉटेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असल्याचे दिसून आले. इतकेच काय जिल्हा परिषदेचे मालकीही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेला अधिकार पोहोचत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण झाली. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थाचे दर जास्त असल्याच्या कर्मचाऱ्यांचे तक्रारी आल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या छतावर हॉटेलची निर्मिती केली. हे हॉटेल लवकरच सुरू होणार आहे.

पण जिल्हा परिषदेच्या जागेची सातबारावर मालकी नसल्याने भविष्यात अडचणी येणार आहेत हे जाणून पदभार घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने त्यांनी जिल्हा परिषदेच्या हद्दीत असलेल्या सर्व इमारती मोकळी जागा, बगीच्या, दक्षिण पंचायत समिती, उत्तर पंचायत समिती आणि रंगभवन चौकात असलेली छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे लवकरच ही जागा जिल्हा परिषदेच्या नावे होणार आहे. ही जागा जिल्हा परिषदेच्या नावे झाल्यानंतर नवीन इमारतीचा आराखडा तयार करणे व इतर सोयी सुविधांसाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे सीईओ कुलदीप जंगम यांनी घेतलेला हा निर्णय जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद होण्यासारखा आहे.

सध्या जिल्हा परिषदेची असलेली इमारतीची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावे आहे. सद्यस्थितीत या जागेची किंमत मोठे असल्याने प्रस्ताव शासनाकडे पाठवणे गरजेचे होते. जिल्हा परिषदेच्या आवारातील सर्व कार्यालय, पार्किंग, बगीच्या, दक्षिण व उत्तर पंचायतीची अशी सुमारे अडीच हेक्टर जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

कुलदीप जंगम, 

सीईओ, जिल्हा परिषद सोलापूर