May 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मंगळवारपासून होणाऱ्या बदल्यांचा कार्यक्रम बारा मे पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. अर्थ विभागातील कर्मचारी व चालक यांच्याही बदल्या करण्यात यावा असे मागणी होत आहे.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. कार्यालय व विभागात बऱ्याच वर्षापासून काम करणाऱ्यांना इतर विभागात बदली देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळेस अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्याही बदल्या केल्या जातील असे त्यांनी जाहीर केले होते. गतवर्षी त्यांनी काटेकोरपणे बदल्या केल्यामुळे अनेक वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना दणका बसला होता. पण त्यानंतर लगेच बदली व प्रमोशन घेऊन पुन्हा मुख्यालयातच घर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाबत ओरड सुरू झाली. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनाही मुख्यालय बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल असे जंगम यांनी स्पष्ट केले होते.

कर्मचाऱ्यांची बदलांची प्रक्रिया सुरू असतानाच जंगम यांची बदली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी पदभार घेतला. प्रशासन विभागाने बदली कार्यक्रम जाहीर केला असला तरी यातून पुन्हा अर्थ विभाग व बदली व प्रमोशन घेऊन बेकायदा मुख्याध्यापक ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याची चर्चा आहे. 12 मे पासून समुपदेशनाद्वारे बदल्यांची प्रक्रिया होणार होती. पण पीसीआर कमिटीने काढलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी विभाग प्रमुख मुंबईत ठाण मांडून आहेत. प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील याही मुंबईत असल्यामुळे मंगळवारपासून होणारी बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चालकांनी मांडली कैफियत…

जिल्हा परिषदेतील परिचर व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत पण गेल्या दहा वर्षापासून चालकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे या बदली प्रक्रिया चालकांच्याही बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरली आहे. त्यामुळे सीईओ जैन यांना इतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी बदली प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी लागणार आहे.

कारवाईच्या फायली गायब…

एकीकडे बदली प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवरून कारवाई करावयाच्या फायली दाबून ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. शिस्तभंगाचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभाग प्रमुखांनी अहवाल दिला आहे. हे अहवाल कुठे दडपण्यात आले आहेत, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे सीईओ जैन यांना याही फायलीचा शोध घेऊन कारवाई करावी लागणार आहे.