सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

अन् कर्णबधिर विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सोलापूर: जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग व गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिऱ्हे येथील कु. स्वराज सत्यवान शेळके (इयत्ता ६ वी) दिव्यांगत्व – कर्णबधिर या विद्यार्थ्यास श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. गतवर्षी पावसाळ्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे श्रवणयंत्रात पाणी गेल्यामुळे यंत्र बंद पडल्याने स्वराजला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. शिक्षकाकडून नवीन श्रवणयंत्र मिळाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

श्रवण यंत्राचे वितरण शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार, प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक शिरशीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक परमेश्वर गामाजी, विशेष शिक्षक आकाश शेंद्रे, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूरचे अमित शहा, विद्यार्थ्याचे पालक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यास श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरजन्य परिस्थितीमुळे श्रवण यंत्रामध्ये पाणी जाऊन ते निकामी झाले होते. परिणामी विद्यार्थ्याला शालेय शिक्षण तसेच दैनंदिन संवाद प्रक्रियेत विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.

या विद्यार्थ्याची ही समस्या तातडीने विचारात घेऊन जिल्हा समन्वयक परमेश्वर गामाजी यांनी नवीन श्रवण यंत्र उपलब्ध करून दिले. या श्रवणयंत्रामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीस, संवाद कौशल्यांच्या विकासास तसेच मुख्य प्रवाहातील शिक्षणात प्रभावी सहभागासाठी मोठी मदत होणार आहे. शिक्षण विभागाच्या संवेदनशीलतेचे व विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षकानी विद्यार्थ्यांच्या गरजेबाबत संवेदनशीलता बाळगत दखल घेतल्याबद्दल कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button