- सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह एकूण सहा ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्चाचा तपशील मुदतीत व विहित नमुन्यात सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्या सर्वांना अपात्र घोषित करून पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यावरही बंदी घातली आहे.
स्मिता मुकाणे, सोमनिंग कमळे, संगप्पा बिराजदार, युक्ता शहा, राजश्री जंगलगी असे पाच सदस्य अपात्र ठरले आहेत. याप्रकरणी सदस्य सिध्देश्वर कुगणे यांनी तक्रार दाखल केली होती.
तसेच माजी सरपंच रमेश पाटील यांनी तत्कालीन सरपंच चिदानंद कोटगोंडे व सदस्य सिध्देश्वर कुगणे, शिवप्पा हत्ताळे, विजयालक्ष्मी बिराजदार, शिल्पा अजावडरे यांनी निवडणूक खर्च विहित नमुन्यात सादर केले नाही, अशी तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती. कुगणे यांनीही बबलेश्वर यांच्यासह पाच सदस्यांनी निवडणूक खर्च विहित नमुन्यात सादर केला नाही, अशी तक्रार शंभरकर यांच्याकडे केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सुनावणी घेऊन तत्कालीन सरपंच चिदानंद कोटगोंडे व सदस्य सिध्देश्वर कुगणे यांचे पद रद्द करून पाच वर्षे निवडणूक लढण्यासाठी अपात्र केले होते. त्यानंतर झालेल्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत भीमाशंकर बबलेश्वर हे निवडून आले होते. कुगणे यांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुनावणी घेऊन सरपंच बबलेश्वर यांच्यासह अन्य पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर आगामी पाच वर्षे निवडणूक लढण्यासही बंदी घातली आहे.

More Stories
फोंडशिरसच्या मतदान केंद्राध्यक्ष व पोलिसाला निलंबित करण्याचे आदेश
बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर; परीक्षार्थीपेक्षा पालकांचीच घालमेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत पोटासाठी आझाद मैदानावर