सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या आठ दिवसांपासून शंभरच्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ कामांसाठी लोकांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर आपली कामे भागवावी लागत असून विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
सोलापूर शहरातील बाँड विक्रेत्याकडून गेल्या आठ दिवसापासून शंभरचे स्टॅम्प मिळणे दुरापास्त झाले आहे. कोषागार कार्यालयाकडून स्टॅम्पचा पुरवठा झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या लोकांना स्टॅम्पसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. गेल्या दोन दिवस स्टॅम्पची विक्री बंद होती. प्रतिज्ञापत्र, बँकांची कर्ज प्रकरणे, जागांचे व्यवहार, भाडेकरार, पार्टनर डीड यासाठी स्टॅम्पची गरज भासते. नोटरीचे व्यवहार शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर होतात पण गेल्या आठ दिवसापासून स्टॅम्प मिळणे दुरापास्त झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. शेवटी वैतागून गुरुवारपासून अनेक नोटरी धारकांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर आपली कामे करण्यास सुरुवात केली आहे. शंभरचा स्टॅम्प उपलब्ध नसल्याने चारशे रुपये भुर्दंड लोकांना सोसावा लागत आहे. बँकांमध्ये 800 चे स्टॅम्प देणे गरजेचे असताना हजारचे स्टॅम्प द्यावे लागत आहेत. त्यामुळे तात्काळ स्टॅम्पची उपलब्धता करावी, अशी मागणी होत आहे.
ऑनलाइन झालेच नाही..
शंभर रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध होत नसल्याने कोषागर कार्यालयाने ऑनलाईनची सोय उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. पण तशी सेवा मिळाली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून आम्ही पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून देत आहोत. यामुळे लोकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे नोटरी एडवोकेट जाहीर सगरी यांनी सांगितले.