सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने साखर कारखानदारांना उसाची टंचाई जाणवणार आहे. अशा परिस्थितीत तेरामैल येथील नव्याने उभारण्यात आलेला ‘लोकशक्ती” साखर कारखाना मंद्रूपच्या युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांनी कसा काय घेतला ? अशी चर्चा आता राज्यभरात सुरू झाली आहे.
मोहोळचे उद्योजक विजयराज डोंगरे यांनी आपले साखर कारखान्याचे स्वप्न साकार करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथे लोकशक्ती साखर कारखान्याची स्थापना करून वेगाने उभारणी केली. कारखान्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यासमोर संकट उभा राहिले. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक उद्योजकांकडे हेलपाटे मारले, पण मदत झाली नाही. त्यामुळे कारखान्याला आर्थिक मदत केलेल्या बँका कर्ज थकल्यामुळे कोर्टात गेल्या. कोर्टाने बँकाची देणी वसूल करण्यासाठी कारखान्याचा लिलाव केला. मंद्रूपचे युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांच्या एप्राॅनडिस्टरलरी या कंपनीला लिलाव मंजूर झाला आहे. मुगळे यांनी साखर कारखाना घेण्याचे धाडस कसे केले? त्यांच्या पाठीमागे कोणाचा आहे वरदहस्त? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.
कारखाना आता कसा चालवणार
मुगळे यांनी लोकशक्ती कारखाना घेतल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्या नावाची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. मंद्रूप परिसरात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे चाऱ्याची टंचाई भासू लागल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस चाऱ्यासाठी जात आहे. अशात त्या परिसरात साखर कारखान्याचे जाळे मोठे आहे. लोकशक्तीची मशिनरी व इतर कामे व्हायची आहेत. त्यासाठी मोठा खर्च आहे. अशात या कारखान्याला ऊस कोठून मिळणार व त्यातून इथेनॉल, वीज निर्मिती व डिस्टलरी कशी चालणार ? अशी चर्चा आता राजकीय मंडळी शेतकरी, व्यापारी व कारखानदारांमध्ये सुरू झाली आहे. हा कारखाना घेण्यामागे माझं नेमकं प्लॅन काय? हे मी लवकरच पत्रकार परिषदेत जाहीर करणार असल्याचे उद्योजक मुगळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या नव्या उद्योजकाच्या डोक्यातील कल्पना काय असतील ? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.