सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदोन्नती झालेल्या केंद्रप्रमुखांना गुरुवारी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी हे केंद्रप्रमुख आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहणार असून अतिरिक्त पदभार घेणारे शिक्षक कार्यमुक्त होणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांनी आता प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करावे, अशी अपेक्षा ईतर शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुखांची 2014 पासून पदोन्नती रखडली होती.  दीड वर्षांपूर्वी पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला मात्र काही शिक्षकांनी हाय कोर्टातून स्टे आणल्यामुळे पुन्हा अडचण निर्माण झाली होती.  मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केंद्रप्रमुखांची पदोन्नती करण्याचे मनावर घेतले. त्यांच्या सूचनेनुसार प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी पदोन्नतीला पात्र शिक्षकांच्या फाईली तपासून गेल्या आठवड्यात ही प्रक्रिया राबवली. मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या उपस्थितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, मुख्य वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख पदोन्नतीचे समुपदेशन करून नियुक्तीचे स्थान निश्चित केले.

केंद्रप्रमुखाच्या विज्ञान 33, समाजशास्त्र 24, इंग्रजी 17, हिंदी सहा, उर्दू एक अशा 81 जागेसाठी 151 पात्र शिक्षकांनी समुपदेशनाला हजेरी लावली. न्यायालयीन 18 नियुक्ती वगळता इतरांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती दिलेल्या केंद्रप्रमुखांना गुरुवारी आदेश वितरित करण्यात आले.  त्यामुळे आता हे केंद्रप्रमुख त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहणार आहेत.

‘त्या” शिक्षकांनाही मोकळे करा…

केंद्रप्रमुखाची बरीच पदे रिक्त असल्याने तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यामुळे हे शिक्षक शाळा सोडून केंद्रप्रमुखाचा कारभार पाहत होते. आता प्रत्येक तालुक्याला जवळपास 50% पदे मिळाली आहेत. त्यामुळे इतर रिक्त जागांचाही पदभार या केंद्रप्रमुखांना देऊन सर्व शिक्षकांना ज्ञानार्जनासाठी मोकळे करावे, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे निवडणूक व साक्षरता अभियानाचे उपक्रम शिक्षकांकडे सोपवण्यात आले आहेत. या उपक्रमाला विरोध करीत गेल्या आठवड्यात शिक्षकांनी आम्हाला ‘शिकवू द्या” म्हणून मोर्चा काढला होता. आता अतिरिक्त पदभार सोडून शिक्षकांनी आपल्या कामाच्या ठिकाणी हजर राहावे,  असे पालकांना अपेक्षित आहे. तालुक्यांना केंद्रप्रमुख मिळाल्याने शिक्षकांचा ताण हलका झाला आहे, अशी प्रतिक्रिया बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष महांतेश कट्टीमनी यांनी व्यक्त केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *