सोलापूर: राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या यादीत अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला आहे जात आहे. शासनाने दुष्काळ असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाले असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात गंभीर तर दोन तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे नमूद केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा ५० ते ५५ टक्क्यांपर्यंतच आहे. परतीच्या पावसाअभावी रब्बीच्या पेरण्या झाल्या नाही ज्या ठिकाणी पेरणी झाली त्या ठिकाणी उगवण झाली नाही तर उगवण झालेली ज्वारी आता करपून जाण्याच्या मार्गावर आहे. खरिपातही पावसाचा खंड पडल्याने शेतीचे नुकसान झाले. तरीदेखील ३५८पैकी केवळ ४३ तालुक्यातच दुष्काळ जाहीर होण्यासारखी स्थिती असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी आता आमच्या तालुक्यात तथा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीची तब्बल चारशेंहून अधिक निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली आहेत.
खरीप हंगामात राज्यातील ३० जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती खराब होती. पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पीकविमा कंपन्यांना २५ टक्के विमा संरक्षित रक्कम देण्यासंदर्भात आदेश काढले असून अद्याप यावर कार्यवाही झालेली नाही. अजूनही शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही.दुसरीकडे कांदा अनुदानही पूर्णपणे मिळालेले नाही. मागील अतिवृष्टीची मदत न मिळालेले शेतकरी देखील हजारोंच्या संख्येत आहेत. लंम्पीने मृत्यू झालेल्या पशुधनाची भरपाई देखील सर्वांना मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त काही कुटुंबांनाही अद्याप मदत मिळालेली नाही. जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरणी १५ टक्क्यांवरच थांबल्या आहेत. धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जात आहे. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून लोकप्रतिनिधींनी दुष्काळाची मागणी लावून धरली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव आघाडीवर आहेत. दुष्काळच्या ४३ तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके आहेत. यामध्ये सांगोला माळशिरस बार्शी तालुक्यात दुष्काळ असून करमाळा व माढा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळी स्थिती असताना त्यांचा यादीत समावेश करण्यात आलेला नाही. कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालावर शासनाने 31 ऑक्टोबर रोजी दुष्काळी तालुक्यांची पहिली यादी जाहीर केली. दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रूप कंदलगाव भंडारकोटे औराद शिवारात दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे बोर आटल्या आहेत तर विहिरी तळाला गेले आहेत अशी स्थिती असताना दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दुष्काळी तालुक्यांना मिळणार ८ सवलती
जमीन महसुलात सूट- सहकारी कर्जाचे पुनर्गठन- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती- कृषी पंपाची चालू बाकी माफ- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी- ‘रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता- गरजेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टॅंकरची सोय- टंचाई जाहीर गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडीत न करणे असे फायदे मिळणार आहेत.