
सोलापूरः मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंद्रूपमधील महिलांनी गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षणासाठी जिल्हाभर लढा तीव्र झाला आहे. कॅन्डल मार्च काढून पुढाऱ्यांना गाव बंदी तर महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या वेशीवर जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देत पुढार्यांना गावबंदीचे फलक लागले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रचारासाठी जाणाऱ्या पुढार्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. मंद्रूप येथील सकल मराठा समाजाने मोर्चा काढीत अप्पर तहसीलदार राज शेखर लिंबारे यांना मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर ग्रामपंचायत समोर महिलांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा गुरुवारी चौथा दिवस आहे. बुधवारी रात्री मुळेगाव येथे कॅण्डल मार्च काढून लक्ष वेधण्यात आले.