सोलापूर: जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उगवण झालेल्या रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे. दोन दिवसापूर्वीच हवामान विभागाने सहा नोव्हेंबर पासून राज्यातील दहा जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त केला होता, तो खरा ठरला आहे.
सोलापूर जिल्हा गेल्या दोन दिवसापासून ढगाळी हवामान निर्माण झाले होते. अशात बुधवारी मध्यरात्री दीड वाजता सोलापूर शहरात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. गणेशोत्सवानंतर पावसाने दडी मारली. नवरात्रमध्ये अपेक्षितपणे पाऊस झाला नाही. त्यामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या. ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. पण त्यानंतर पाऊस झाला नसल्याने व कडाक्याचे ऊन पडत असल्याने या ठिकाणाच्या पिकांनी माना टाकल्या होत्या. अशात या पावसाने दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यात उगवन झालेल्या ज्वारीला या पावसाने जीवदान दिले आहे. जिल्हा ढगाळी हवामान कायम असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.