सोलापूर : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांसाठी पिक विमा कंपनीने दिवाळीपूर्वीच १७०० कोटी पिक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.
सरकारने यंदा प्रथमच खरीप हंगामासाठी एक रुपयात पिक विमा ही योजना राबवली होती. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता. जवळपास एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता पण यंदाच्या खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे पिके हातचे गेले त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पिक विम्यातून नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांचा तगादा सुरू झाला होता. यावर विविध जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना 25 टक्के ॲग्री पिक विमा देण्याच्या आदेश दिले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही विमा कंपनीला शेतकऱ्याने तातडीने पीक विमा अग्रीम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिकविमा बाबत बैठक घेऊन विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे आग्रही होते. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या आदेशाविरुद्ध विमा कंपन्यांनी अपील केले होते. जसजसे निकाल येईल तसे विमा कंपन्यांनी ऍग्रीमची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. यात आता पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ५३२ शेतकऱ्यांसाठी १११ कोटी ४१ लाख विमा ॲग्रीम मंजूर झाला आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.