सोलापूर : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा व माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुखांच्या भूमिकेमुळे अडचणीत आलेल्या उप अभियंता सुनील कटकधोंड, माध्यमिक शिक्षण विभागातील तात्कालीन लिपिक संजय बाणूर यांच्याच कामाची आणखीन चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन योजनेच्या कामातील अनियमिततेमुळे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची बदली करण्यात आली. त्यानंतर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत उपाभियंता सुनील कटकधोंड यांचे नाव आल्याने त्यांच्याकडील पदभार काढण्यात आला. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील कार्यकारी अभियंता पाटील यांच्याकडे पदभार आहे. पण या पदावर काम करण्यास ते उत्सुक नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामुळे कटकधोंड यांच्या कामाची पद्धत चांगली होती, अशी चर्चा कर्मचारी, माजी पदाधिकारी, ठेकेदारांमध्ये सुरू आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार मारुती फडके यांनी घेतला. त्यामुळे टप्पा अनुदानातील शालार्थ आयडीसाठी प्रलंबित असलेल्या फाइली निकाली निघतील, अशी अपेक्षा होती. याच दरम्यान सीईओ मनीषा आव्हाळे यांनी विभागीय आयुक्तांच्या परवानगीविना प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मूळ ठिकाणी जाण्यास सांगितले. माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिक संजय बाणूर यांचाही यात नंबर लागला. बाणूर प्राथमिक विभागाकडे गेल्याने माध्यमिक विभागातील अनेक कामे प्रलंबित राहिली. अशात फडके दीर्घ रजेवर गेले. त्यामुळे टप्पा अनुदानाचे काम मार्गी लागण्यासाठी बाणूर यांच्याकडे माध्यमिकचा पदभार ठेवावा, अशी शिफारस अनेकांनी केली. याच दरम्यान एका संघटनेने त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने प्रकरण तापले होते. या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशी समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. पण माध्यमिकमधील प्रलंबित कामाचा ढिगारा पाहून बाणूर असते तर अशी वेळ आली नसती अशी चर्चा शिक्षकांमध्ये होत आहे. एक उपअभियंता व एका लिपिकाचा पदभार काढल्यानंतर अजूनही त्यांच्या कामाची जिल्हा परिषदेत छाप असल्याचे दिसून येत आहे.