June 9, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार

सोलापूर : करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केलेले जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अतिरिक्त कामकाज पाहणारे विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्याय मिळवून देण्यासाठी “कास्ट्राइब’ जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने पुढाकार घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अतिरिक्त कामकाज पाहणारे विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर नसल्याबाबत करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कदम यांनी निलंबित केले आहे. म्हेत्रे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात राहून समाजकल्याण विभागातील जबाबदारी पार पाडण्यासाठी रात्रंदिवस काम केले आहे. असे असताना त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे मत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानंतर आता कास्ट्राईब संघटनेनेही म्हेत्रे यांना न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय झालेले विस्ताराधिकारी मनोज म्हेत्रे यांची मी भेट घेतली व न्याय मिळवून देण्यासाठी संघटना पाठीशी असल्याबाबत त्यांना आश्वासित केल्याची माहिती कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी दिली. म्हेत्रे यांच्यावरील कारवाई अन्यायकारक आहे. सीईओनी दिलेल्या अधिकाराचा गटविकास अधिकारी गैरवापर करीत आहेत. याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. म्हेत्रे यांच्याबाबतीत सीईओनी न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण कोणत्याही कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. कास्ट्राईब संघटना ही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. संघटनेने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला पत्र दिले आहे. मागण्यांबाबत चालढकल झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पाठपुरावा करूनही सुरू केले जात नाही. याबाबतही सीईओनी सकारात्मक भूमिका घ्यावी असे त्यांनी मागणी केली आहे.