सोलापूर : फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनीप्रदूषण, आगीच्या घटना आणि विचित्र अपघात तसेच विविध आजारांना मिळणारे निमंत्रण अशा स्थितीत फटाके वाजविण्याबाबत लहान मुलांसह प्रौढांचीही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आवाहननुसार माझी  वसुंधरा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने फटाके बंदीचे  ठराव घेतले. या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील टोणेवाडी येथील रुचिता क्षीरसागर हिने बालदिनी प्राचार्यांना लिहिलेल्या पत्रात आयुष्यभर फटाके न फोडण्याचा संकल्प केला आहे. तिच्या या संकल्पचे कौतुक होत आहे.

खरे पाहता पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची आवश्यकता आहे.व्यक्ती गरीब असो की श्रीमंत,दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी करतोच! दरम्यान, फटाक्यांमुळे वायु प्रदूषण होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी उच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा ही वेळ निश्चित करून दिली आहे. या वेळमर्यादेचे पालन होणे आवश्यक आहे.फटाक्यांमुळे देशाची राजधानी नवी दिल्लीत २००हून अधिक ठिकाणी आग लागली.पुण्यात २५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. ठाण्यातही दहा ठिकाणी आग लागली. कर्नाटकात बंगळुरूजवळ झालेल्या दुर्घटनेत फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीमुळे बारा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मागील महिन्यात घडली. फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ झाल्याने व धुक्यामुळे पंजाबमधील लुधियानात शंभर वाहने एकमेकावर आदळून दुर्दैवी विचित्र अपघात झाला. त्यात जीवितहानीबरोबर गाड्यांचेही प्रचंड नुकसान झाले.अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशभरात दरवर्षी घडतात. फुफ्फुसाचे,डोळ्यांचे, कानाचे व त्वचेचे आजार-विकार सुरू होतात. फटाक्यांमुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांमध्ये साठ टक्के प्रमाण बारा वर्षाखालील बालकांचे असते असेही दिसून आलेले आहे.याचा अन्य पशू-पक्ष्यांनाही फटका बसतो हे वेगळे सांगायला नको! दिवाळीच्या काळात प्रदूषणाची पातळी मोठमोठ्या शहरांबरोबरच सर्वत्र कमालीची वाढत आहे.या पार्श्वभूमीवर लोकांची विशेषत: बालगोपाळांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.

पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक (योजना) राजेश क्षीरसागर यांची मुलगी रुचिता ही बारामती येथे तिसरीत शिकते. दिवाळी सुट्टीत गावी आल्यावर तिने फटाक्याच्या दुष्परिणामाचे गंभीर दाखल घेतली. दरवर्षी कमीअधिक प्रमाणात फटाके वाजविणा-या रुचिताने या दिवाळीत फटाके घेण्यासाठी आई-वडिलांकडे कोणताही हट्ट केला नाही. खरे पाहता तिच्या घरची परिस्थिती पाहता तिला हजारो रुपयांचे फटाके घेणे अशक्यही नव्हते. तिला तिचे मामा गौरव व मामी सारिका या नातेवाईकांनीही फटाके वाजवण्याबाबत आग्रह केला. परंतु तिने नकार दिल्याचे आणि फटाक्यांच्या पैशातून गरजूंना दिवाळी फराळ आपण देत असल्याचे तिची आई ज्योती क्षीरसागर यांनी सांगितले. प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन तिने यापुढे फटाके न फोडण्याची शपथ घेतली. केलेला ‘प्रण’ तिने आपण शिकत असलेल्या बारामती येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या ऋचा तिवारी यांनाही पत्राने लिहून कळवला आहे. दिवाळीत गायनाचा सराव करून आणि मित्र मैत्रिणींबरोबर खेळून आपण सुट्टीचा आनंद घेत आहोत, असे त्यात तिने म्हटले आहे.

इतरांनीही यातून बोध घ्यावा म्हणून तिच्या पालकांनी तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती हातात पणती घेऊन दिव्याच्या साक्षीने, यापुढे मी कधीही फटाके वाजवणार नाही असा संदेश देत आहे आणि तुम्हीही वाजवणार नाही ना? असा सवाल करून अंतर्मुख व्हायला भाग पाडत आहे.सामाजिक कार्याचे बाळकडू घरातच मिळत असलेली रुचिता गायनातून साक्षरता प्रचाराचेही काम करीत आहे. कोरोना काळातही ‘स्टे ॲट होम’चा संदेश घराच्या खेळातून तिने अनोख्या पद्धतीने दिला होता.

“रुचिताने केलेला संकल्प दिशादर्शक आहे. तिच्याप्रमाणे इतरही मुलांनी प्रण घ्यावा.
-ऋचा तिवारी,
प्राचार्या,अनेकांत इंग्लिश स्कूल बारामती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *