सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, येळेगाव तेरामैल परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पावसाळ्यात झाला नाही असा पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.
हवामान विभागाने कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी हवामान निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळी ढगाळी हवामान होते, पुन्हा दुपारी कडक ऊन पडले. त्यामुळे कोणालाही पावसाची शक्यता वाटली नाही. पण सायंकाळी पाच वाजेनंतर ढग भरून आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, येळेगाव, तेरामैल परिसरात जोरदार पाऊस पडला. या पावसाने शेतातील चारीमध्ये पाणी साठले. यंदाच्या पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच असा पाऊस झाल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सोलापूर शहरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी या पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पावसादरम्यान पहावयास मिळाला. या अवकाळी पावसाने ज्वारीला चांगलाच फायदा होणार आहे. बऱ्याच ठिकाणी ज्वारी पोटऱ्यात आली आहे. उंच वाढलेल्या ज्वारीला मात्र वादळी पावसाने फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी नऊ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या पावसानंतर ज्वारीची पेरणी केली आहे. या ज्वारीला आजच्या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. द्राक्ष, कांदा या पिकांना मात्र या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे कुठे आनंद व्यक्त होत आहे तर कुठे चिंतेचे वातावरण दिसून आले.