सोलापूर: जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना तब्बल दहा वर्षानंतर प्रशिक्षण देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी नियोजन केले आहे.
2013 मध्ये अक्कलकोटला कनिष्ठ प्रशासन अधिकारी व अधीक्षक यांच्यासाठी पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण झाले होते. परंतु आजपर्यंत लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना झेडपी स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाची गती वाढवण्यासाठी व प्रशासन गतिमान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केलेल्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात अंदाजे 550 कर्मचाऱ्यांचे यशादाच्या प्रविण प्रशिक्षकांमर्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच 1 जानेवारी ते 13 जानेवारी या काळात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.प्रशिक्षणानंतर फीडबॅक टेस्ट घेण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ता विकासास हातभार लागण्यास मदत होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले.