सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या हैराण आहेत. सन 2014 मध्ये घेतलेल्या ड्रीपच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँक व कारखान्याचे कर्मचारी रात्री फिरून दुसऱ्या कारखान्याकडे चाललेल्या गाड्या आडवीत असल्यामुळे वादाचे प्रकार घडत आहेत.
सन 2014 मध्ये दक्षिण सोलापुरातील साखर कारखान्यांनी सभासदांना ड्रीपसाठी कर्ज दिले होते. हे कर्ज बँका व फायनान्सकडून कारखान्यांनी पुरवले होते. पण आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी मागणी करूनही या ड्रीपचे अनुदान खात्यावर जमा झाले नाही. आठ वर्षे या कर्जाच्या वसुलीबाबत बँक व फायनान्सने आत्तापर्यंत विचारणा केली नव्हती. मात्र लोकमंगलच्या सभासदांना मुंबईच्या फायनान्सच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा आल्या आहेत तर सिद्धेश्वर कारखान्याचे कर्मचारी बडोदा बँकेच्या कर्ज वसुलीसाठी दुसऱ्या कारखान्याकडे जाणाऱ्या गाड्या अडवून आपल्या कारखान्याकडे वळवीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असून हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. आम्ही कर्ज भरायला तयार आहोत अनुदानाची रक्कम कुठे आहे सांगा? असा सवाल शेतकरी करीत आहेत. पण कारखान्याचे कर्मचारी मात्र याबाबत उडवाउडवी करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनुदान नेमके मुरले कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावरून ड्रीपचा आणखी एक महाघोटाळा उघडकीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.