सोलापूर : राज्यातील शेती अधिक आधुनिक,स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन २०२५-२६ अंतर्गत “राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युरोप देशांचा अभ्यास दौऱ्यास दि.१५ रोजी प्रारंभ झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५२ प्रगतिशील शेतकरी व दोन कृषी अधिकारी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले असल्याची माहिती श्रीक्षेत्र मार्डीचे भूमिपुत्र तथा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमधून दिली आहे. पॅरिस महाल येथे या शेतकऱ्याने शिवजयंती साजरी केली. “जय शिवाजी, जय भवानी’ च्या घोषणांनी पॅरिस महल दुमदुमून गेला.
दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवजयंतीचे औचित्य साधून पॅरिसमधील महलात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीक्षेत्र मार्डीचे भूमिपुत्र तथा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ कदम यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी युरोप अभ्यास दौऱ्यात असलेल्या बावन्न शेतकऱ्यांच्या व दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन प्रतिमेचे तसेच तिरंगा व भगव्या ध्वजाचे पूजन मान्यवर अधिकारी व शेतकरी बंधूंच्या हस्ते करण्यात आले.
अभ्यास दौऱ्यास प्रस्थान होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या गटाशी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देत या दौऱ्यातून मिळणारे ज्ञान,तंत्रज्ञान व अनुभव राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून आधुनिक व जागतिक दर्जाची शेती उभारण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल,असे त्यांनी यावेळी नमूद केले.
हा अभ्यास दौरा फ्रान्स, स्वित्झर्लंड,जर्मनी आणि नेदरलँड्स या प्रगत कृषी देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.या दौऱ्या दरम्यान शेतकरी आधुनिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण,सेंद्रिय शेती,दुग्धव्यवसाय,सहकारी प्रक्रिया उद्योग,हरितगृह तंत्रज्ञान,जलसंधारण व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत. फ्रान्समध्ये व्यावसायिक धान्यशेती (गहू,बार्ली,मका इ.) व दुग्धशेती प्रकल्पांना भेट देऊन पीक फेरपालट,मृदा व्यवस्थापन व अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्री यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.स्वित्झर्लंडमध्ये सेंद्रिय शेतीसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या Research Institute of Organic Agriculture (FiBL) या संस्थेला भेट देऊन सेंद्रिय उत्पादन प्रणाली,संशोधन पद्धती व शाश्वत शेती मॉडेल्सची माहिती घेण्यात येईल.तसेच पर्वतीय दुग्धव्यवसाय व सहकारी चीज उत्पादन प्रणालीचा अभ्यास केला जाणार आहे.नेदरलँड्समध्ये जगप्रसिद्ध Aalsmeer Flower Market येथे आंतरराष्ट्रीय फुल बाजारपेठ, लिलाव प्रणाली व लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाचा अभ्यास तसेच अत्याधुनिक हरितगृह प्रकल्प,हवामान नियंत्रण प्रणाली व जलव्यवस्थापन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.
या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसोबतच मूल्यवर्धन,निर्यात संधी,शाश्वत शेती मॉडेल्स व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPO) उपयुक्त सहकारी रचना समजून घेण्यास मदत होणार आहे.अभ्यास दौऱ्यातील अनुभवांच्या आधारे सहभागी शेतकरी आपल्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत चालू वर्षापासून या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान एक लाख रुपयांवरून वाढवून दोन लाख रुपये केले आहे.या निर्णयामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना परदेशातील प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
शासनाच्या या सकारात्मक पावलामुळे राज्यातील शेती क्षेत्राला जागतिक दृष्टीकोन प्राप्त होऊन उत्पादनक्षमता व उत्पन्नवाढीस चालना मिळेल,असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे राज्यातील शेती क्षेत्रात नवसंशोधन,आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब व शाश्वत विकासाला बळकटी मिळणार असून महाराष्ट्रातील शेतकरी जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम होतील अशी माहिती राज्यातील बावन्न शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत युरोप च्या अभ्यास दौऱ्यात असलेले काशिनाथ कदम यांनी दिली.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की
दहावीच्या परीक्षेला गलेलठ्ठ विद्यार्थी; नंदेश्वरला पकडले 10 बोगस परीक्षार्थी