सोलापूर : महानगरपालिकेत दुसऱ्यांदा भाजप सत्तेत आल्यानंतर आयोजित पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या मुद्द्यावरून सभा तहकुबीची नामुष्की पत्करावी लागली. या सभेत भारतीय जनता पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी ९ पैकी ८ नावे जाहीर केल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत सभागृहात घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक थेट महापौरांच्या व्यासपीठावर धावून आले. त्यामुळे महापौर विनायक कोंड्याल यांनी सभा तहकूब केली.
सोलापूर महानगरपालिकेत भाजप सत्तेवर आल्यानंतर पहिलीच सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय मांडण्यात आला. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नऊपैकी आठ नावे जाहीर केली. त्यातील एक नाव प्रलंबित ठेवल्याने विरोधकांनी पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करीत हल्लाबोल केला. अमोल शिंदे यांनी भाजपच्या या भूमिकेवर आक्षेप घेत, सभागृहाची दिशाभूल केली जात आहे असा आरोप केला. याला चेतन नरोटे यांनीही पाठिंबा दिला. उर्वरित नाव पुढील सभेत जाहीर केले जाईल, असे महापौर कोंड्याल यांनी सांगितले. पण या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी महापौरांच्या निर्णयावर आक्षेप घेत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढताच महापौर विनायक कोंड्याल यांनी सभा तहकूब केली. भाजपचे नऊ स्वीकृत नगरसेवक म्हणत आठ जणांची नावे का वाचून दाखवली असे विचारले असता सभागृह नेते काळे म्हणाले की पुढील सभेत एकाचे नाव जाहीर केले जाईल. यावरून भाजपमधला कलह पुन्हा एकदा पुढे आला आहे.
हे झाले स्वीकृत नगरसेवक
रोहिणी तडवळकर, वृषाली चालुक्य, ज्ञानेश्वर म्याकल, अक्षय अंजीखाणे, रुद्रेश बोरामणी, श्रीनिवास दायमा, ऋषिकेश म्हेत्रे, मनीष केत यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे.
स्थायीसाठी 16 जणांची निवड
या सभेत स्थायी समितीचे पुढीलप्रमाणे सदस्य निवडण्यात आले. भाजपकडून अविनाश पाटील, सतीश शिरशीला, रंजीता चाकोते, विजू प्रधाने, गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजकुमार पाटील, अमर पुदाले. शिंदे सेनेचे अमोल शिंदे, एमआयएमचे अजहर हुंडेकरी.

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार