सोलापूर : वीस हजाराची लाच घेताना सोलापुरातील वकिलाला तर दोन हजाराची लाच घेताना पंढरपुरातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले आहे.
वीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दयानंद माळी या वकिलास अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदारविरुध्द सह निबंधक को ऑप सोसायटी पुणे यांच्या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे. या केसचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी व निकालपत्रासाठी सह निबंधक को ऑप सोसायटीतील क्लार्कला यांना ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून यातील आरोपी तक्रारदार यांचे वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करीत असल्याबाबात अॅन्टी करप्शन ब्यूरोकडे तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ७ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता वकील दयानंद माळी यांनी तक्रारदारकडे प्रलंबित असलेल्या केसचा निकाल बाजूने लागण्यासाठी तेथील क्लार्कला ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून यापूर्वी घेतलेले ५ हजार रुपये वजा करून उर्वरित ४५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हप्ता २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वकील दयानंद माळी ( रा. सोरेगाव) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार सोनवणे, पकाले, हाटखिळे, किनगी, सुरवसे यांनी केली आहे.
महावितरणच्या अभियंत्यास अटक
पंढरपूर ग्रामीण येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंत्यास २ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. साईनाथ नामदेव सनगर (वय ४०, रा. शिवपार्वती नगर, कराड नाका जवळ पंढरपूर) असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. ट्रांसफार्मरच्या विद्युत कनेक्शनच्या परवानगीसाठी कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. दोन हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साईनाथ सनगर यांना रंगेहाथ पकडले.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की