पोलीस आयुक्तांच्या नावे असलेली गृहनिर्माण संस्था अडचणीत
- राजकुमार सारोळे
-
सोलापूर : अलिकडे जागांच्या किमती वाढल्याने अनेक वाद निर्माण होतात. पहिल्यांदा हे प्रकरण पोलिसात जातं आणि पोलीस अशी प्रकरण सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करतात. काहीच नाही झाले तर मात्र प्रकरण कोर्टात जाते. पण असेच पोलिसांच्या बाबतीत घडले तर… यालाही उत्तर मिळत नाही, असाच प्रकार सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस गृहनिर्माण सोसायटीच्या बाबतीत घडला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथे नुकतेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्याहस्ते फलकपूजन झालेली महेश गौरी पोलीस गृहनिर्माण संस्था वादातील ठरल्याचे दिसून आले आहे.
सोलापूरचे तत्कालीन आयुक्त महेश गौरी यांच्या काळात म्हणजेच 1994 मध्ये पोलीस गृहनिर्माण संस्था स्थापन झाली होती. या संस्थेने पोलीस आयुक्तालयातील अनेक कर्मचाऱ्यांना सदस्य करून घेतले व केगाव, शिवाजीनगर येथे 35 एकर जमीन घेतली. या जमिनीतून दहा रुपये स्क्वेअर फुटप्रमाणे पोलीस व अधिकाऱ्यांना 1000, 3000 व 5000 स्क्वेअर फुटाचे प्लॉट देण्याचे ठरले. त्याप्रमाणे सदस्य झालेल्यांकडून पैसे घेण्यात आले. सुरुवातीला पैसे भरलेल्यांना तुळशीदास जाधव गृहनिर्माण संस्था या नावे बिल व मंजुरीपत्र देण्यात आले. पुढे हे पत्र परत घेऊन महेश गौरी असे गृहनिर्माण संस्थेला नाव दिले. पण पुढे या संस्थेच्या काहीच हालचाली झाल्या नाहीत. अलीकडच्या काळात सोलापूर परिसरात महामार्गाचे जाळे पसरले. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. केगाव परिसरात पोलिसांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या जागेलाही महत्त्व आल्याने काही सभासदांनी संस्थेच्या प्लॉटमध्ये घरे उभारण्यासाठी पाऊल उचलले आहे. केगाव येथील गट नंबर 11 मध्ये अधिकाऱ्यांचे मोठे प्लॉट आहेत. पण या विभागात अंतर्गत रस्ते लाईट व ड्रेनेजची व्यवस्था नाही. त्यामुळे आमदार निधीतून काही मदत मिळते का यासाठी वृक्षारोपण व फलकपूजनाच्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना बोलावण्यात आले होते. जागेची स्थिती पाहून आमदार देशमुख यांनी सदस्यांना फटकारले. अंतर्गत सुविधा गृहनिर्माण संस्थेनेच करावयाची असून या संस्थेला येणाऱ्या जोड रस्त्याबाबत आमदार निधीतून मदत मिळते का ते मी पाहिन असे स्पष्ट केले. त्यामुळे आता सभासदांना अंतर्गत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतःचा मोठा निधी उभा करावा लागणार आहे. यातील बरेच प्लॉट कर्मचाऱ्यांनी इतरांना विकले आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना प्लॉट दिले नसल्याची तक्रार आहे. पोलीस गृहनिर्माण संस्थेसाठी जेथे जागा घेतली तेथे रस्ता व इतर सुविधांची अडचण आहे. संस्था उभारणीसाठी पुढाकार घेतलेले तत्कालीन पोलीस उपाधीक्षक पाटील व पगारे हे सध्या हयात नाहीत. त्यांच्या मुलांनी अधिकार दिल्याने इतर सभासदांनी संस्था उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत असे सभासदांकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत निवृत्त उप अधीक्षक श्रीकांत कांबळे, दिगंबर जाधव, दिलपाक यांनी गृहनिर्माण संस्था उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सभासदांकडून वर्गणी घेऊन जागेची मोजणी करून हद्द निश्चित केली आहे. आत्तापर्यंत कोणीच पुढाकार घेत नसल्याने पोलीस गृहनिर्माण संस्था तीस वर्षापासून वादातीतच ठरली आहे.
वृक्षारोपण केले…
-
संस्थेचे साडेतीनशे सभासद आहेत. केगाव व शिवाजीनगर येथे जागा आहे. केगाव येथील गट नंबर 11 मध्ये आम्ही मोजणी करून प्लॉट निश्चित केले आहे. या प्लॉटमध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेतला आहे. अंतर्गत सुविधासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाजीनगर येथील जागेचे काम दिगंबर जाधव पाहतात. या जागेची मोजणी झाली आहे. बऱ्याच दिवसानंतर संस्थेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून सभासदांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असे निवृत्त उपअधीक्षक श्रीकांत कांबळे यांनी सांगितले
.