जिल्ह्यात ऑक्टोबर हिटने रोखली रब्बीची पेरणी
![]()
सोलापूर : जिल्ह्यात सध्या ऑक्टोबर हिटने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेल्या आठवड्यात रिमझिम झालेल्या पावसाची ओल कडाक्याच्या उन्हाने उडून गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करता आलेली नाही. अनेक गावातील शिवारामध्ये दुष्काळाचे संकट स्पष्टपणे दिसत आहे. हे संकट टाळण्यासाठी उजनीतून सीना नदीवरील शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद आहे पण त्यापुढील पाकणीपासून कोर्सेगावपर्यंत ९ बंधारे भरण्यासाठी पाणीवाटप धोरणात तरतूद करा व सध्या पिण्याच्या पाण्यासाठी सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार दिलीपराव माने यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे धीरज साळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिक, शेतकरी यांच्यावतीने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता यांना भेटून सीना नदीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून सीना नदी काठच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी प्रकल्पाच्या पाणी वाटप नियोजनात बदल करणे आवश्यक आहे. सध्या शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्यापुढील पाकणी ते कोर्सेगावपर्यंत 9 बंधाऱ्यात पाणी सोडण्याची ततरतूद करा. याही बंधाऱ्यावर पाणीपुरवठा योजना आहेत. त्यामुळे या भागातदेखील पाणी सोडणे गरजेचे आहे. शासनाने समन्यायी वाटप धोरण स्वीकारले असून यापुढे सीना नदीतून पाकणी बंधाऱ्यापासून ते कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन करा, अन्यथा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे कायदेशीर दाद मागू असे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगितले. पावसाचे चारही महिने संपले तरी जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही. खरीप पिके हातची गेली. तर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या सीना कोरडी असल्याने नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाण्याची, जनावरांसाठी व पिकांसाठी सीना नदीत सद्यस्थितीत पाणी सोडणे आवश्यक आहे. तरी या भागातील परिस्थितीचा विचार करून सीनादीत कारंबा शाखा कालवा कि.मी. 39 मधून पाकणी को.प. पासून कोर्सेगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी माने यांनी केली.
यावेळी कार्यकारी अभियंता संभाजी माने, दिगंबर मेठे, प्रकाश आवताडे, विकास पाटील, शिवाजी पाटील, गोवर्धन जगताप, बालाजी येलगुंडे, काशिनाथ गौडगुंडे, सोमनाथ गायकवाड, लता जावीर,ज्ञानोबा साखरे,गणपत बचुटे, अशोक गुंड, उमाकांत बचुटे, कुमार बचुटे, अजय सोनटक्के, सुदर्शन पाटील, निखिल देशपांडे, जैनुद्दीन शेख, तानाजी सिनगारे, प्रभाकर गुंड, पृथ्वीराज माने, युवा मंच अध्यक्ष सुनील जाधव, उमेश भगत, तात्या कदम, किरण बंडगर,महेंद्र खटके, अजय रेवजे, ज्ञानेश्वर साळुंखे, दत्ता पवार, तुकाराम भडकुंबे, पठाण सलगर, मुरलीधर शिंदे,आदीसह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी उपस्थित होते.
मंद्रूप परिसरात गंभीर परिस्थिती…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, निम्बर्गी, येळेगाव या शिवारात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. खरिपची पेरणी करता आली नाही आणि आता रब्बी पेरणीही अडकली आह़े. कडक उन्हाने गवतही वाळून गेल्याने जनावराचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना अजूनही पाऊस होईल अशी आशा वाटत आहे.