March 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

तलाठी निंगाप्पा कोळी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी

सोलापूर : शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वारस नोंद होत असताना तलाठी निंगाप्पा कोळी यांनी अनेकांकडून हजारो रुपये घेऊन काम न केल्याबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे व कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तलाठी निंगप्पा कोळी यांची मंद्रूपला नियुक्ती असताना त्यांनी मंद्रूप व येळेगाव येथील शेतकऱ्यांकडून वारस नोंदीसाठी हजारो रुपये घेतले. परंतु अप्पर तहसील कार्यालयाकडे प्रत्यक्षात प्रकरणच दाखल केले नाही. वास्तविक शासनाच्या 85 अ कलमान्वये  केवळ शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर वारस नोंद होते.  परंतु तलाठी कोळी यांनी वारस नोंद करण्यासाठी मोठा खर्च येतो म्हणून शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेतले पण प्रत्यक्षात प्रकरणच दाखल केले नाही. त्यानंतर त्यांची सादेपूर येथे बदली झाली.  तेथेही त्यांनी सादेपूर व बाळगी परिसरातील शेतकऱ्यांना वाळू उपशावरून ब्लॅकमेल केले. त्यामुळे आता त्यांची तेथून बदली झाली आहे. पण तलाठी कोळी यांनी दाखल केलेल्या आमच्या कामाचे काय झाले म्हणून अनेक शेतकरी मंद्रूपच्या अप्पर तहसील कार्यालयाकडे हेलपाटे घालत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही तलाठी कोळी यांच्यावर कारवाई झालेली नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तलाठी कोळी यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी लोकशासन आंदोलन पार्टीने केली आहे.

‘मंद्रूप येथील काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे प्रकरणे दिली होती. त्याची पूर्तता मी करीत आहे. कोणाची तक्रार येऊ देणार नाही अशी व्यवस्था केली आहे”.

निंगाप्पा कोळी, तलाठी