सोलापूर : आरोग्यदायी चंदन बटवा ही भाजी तुम्ही खाल्ली का? अरे आम्हाला ही भाजी माहीतच नाही? मग वाट कसली बघता, चला तर बाजारात. उद्या होणाऱ्या वेळा अमावस्या सणानिमित्त बाजारात रानभाज्याची मोठी आवक झाली आहे.

गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी वेळा अमावस्या आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या अमावस्याला मोठे महत्त्व आहे. वेळा अमावस्यानिमित्त शेतात सहपरिवार पांडवपूजा केली जाते. या पूजेवेळी शंभर भाज्या व फळभाज्या मिळून बनवलेली भाजी व बाजरीच्या उंड्याचा (सीमावर्ती भागात याला खज्जीभजी असे म्हणतात) नैवेद्य दाखविला जातो. सर्व भाज्या मिळून बनवलेली ही भाजी आरोग्यदायी असते. या भाजीमध्ये चंदनबटवा, पाथर, चुका, चिघळ, खुडलेला हरभरा या रानभाज्याबरोबर बाजारात उपलब्ध होणाऱ्या दररोजच्या भाज्या, फळभाज्या व सर्व प्रकारच्या डाळी मिसळल्या जातात. त्यामुळे ही भाजी बाजारीच्या उकडलेल्या उंड्याबरोबर खाताना बरीच चविष्ट लागते. या भाज्यातील विविध गुणधर्मामुळे आरोग्याला चांगलाच फायदा होत असल्यामुळे अनेक दिवसापासून ची ही परंपरा आहे.

वेळा अमावस्याच्या भाजीमध्ये हमखास मिक्स करण्यात येणारी ‘चंदन बटवा” ही हिरवी पालेभाजी गुणकारी मानली गेली आहे. या भाजीमध्ये अ जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फोरस, आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आहेत. या पालेभाजीमध्ये लोह आणि फायबरही आहे. चंदनबटव्याची पालेभाजी थंडीच्या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. या पालेभाजीच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका टाळता येऊ शकतो, असे आरोग्यातील तज्ञ सांगतात त्यामुळे बाजारात आज ही भाजी हमखासपणे तुम्हाला उपलब्ध होईल.

जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी १५३०पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत. कोळी, गोंड, गोवारी, ढिवर या चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यान्नात सुमारे २५ रानभाज्यांचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे.त्यांना ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे. त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. पश्चिम महाराष्ट्रात व कर्नाटक सीमावृत्ती प्रांतात वेळा अमावस्या दिवशी हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांची भाजी तयार करून खाण्याची परंपरा आहे. या दिवशी शेतकरी ज्वारीच्या शिवारातील मध्यभागी झाडाच्या सावलीखाली पांडव पूजा मांडून सर्व भाज्यांचा नैवेद्य दाखवतात गाव शिवारातील दैवतांनाही याचे नैवेद्य दिले जाते आणि त्यानंतर सहपरिवार व आमंत्रित केलेल्या पाहुण्यासह या आहाराचा पाहुणचार घेतला जातो.

वरील रानभाज्याबरोबरच तोंडले, नवलकोल, भेंडी, पालक, कोथिंबीर, मेथी लिंबु,चवळी, मका,पुदिना,अळंबी, मोहरीची पाने,कांदा, वांगे, कारले, टोमॅटो, गाजर, ओवा,वाटाणे, शेंग, बटाटा, सर्व प्रकारच्या डाळी, मूग, मटकी, वाटाणा, पावटे, चवळी, हुलगे, कारळ, हुरडा, डहाळा, घेवडा, कडवंची, भोपळा, मुळा, मुळ्याची शेंग, लाल व हिरवी मिरची, शिराळे, दोडका, घोसाळे, पडवळ, पालक, कांद्याची पात, रताळे, हळद,गवार, सुरण, कच्चे केळे अशा बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या सुमारे 76 भाज्यांचा वापर केला जातो असेही अनुभवी महिलांकडून सांगितले जाते. मग उद्या वेळ दवडू नका, या ‘खज्जीभजीचा” आस्वाद घ्या व आरोग्यदायी राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *