सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचे बंद घर फोडून दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्यास सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्या चोरट्याने याच परिसरातील आणखी एका घरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.

पोलीस निरीक्षक अश्विनी शामराव भोसले (रा. प्लॉट नं. ५४, पाटील नगर, विजापूर रोड, सैफुल, सोलापूर) या दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या आई आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी रजा घेऊन मुंबई येथे गेल्या होत्या. रजा संपल्यानंतर त्या घरी परत आल्या. तेव्हा त्यांच्या घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी घरातील ऐवज तपासुन पाहिला असता, बेडरुममधील कपाटातील ६ सोन्याच्या बांगड्या (वजन सुमारे १२० ग्रॅम) व  ३५ हजाराची रोकड असा एकुण  ६ लाख ३५ हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले. या घटनेबाबत त्यांनी, विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या अज्ञात चोरटयाविरुध्द भा.दं.वि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर पाटील येथील सूरज गणपतराव पाटील (रा. ३४७/१, समर्थ बंगला, सवेरा नगर, गोविंद मेडिकलच्या मागे सैफुल विजापूर रोड सोलापूर, सध्या रा. पुणे) यांचे वडील हे मुलास व सुनेस भेटण्याकरीता १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. पुणे येथे घर बंद करुन गेले. ते दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. परत सोलापूर येथील घरी आले. तेव्हा त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातील लोखंडी कपाट उचकटून, एक सोन्याची पिळयाची अंगठी, चांदीचे पैजन, शिक्के व रोख रक्कम असा  ३२ हजाराचा ऐवज चोरीस गेला होता. या घटनेबाबत त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटया विरुध्द भा.दं.वि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे तसेच गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह घटनास्थळास भेट दिली होती. गुन्हे शाखेडील तीन तपास पथके आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच खबऱ्यांना भेटून त्या माध्यमातून शोध घेत होती.

दोन्ही घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात सी.सी.टी.व्ही फुटेज जवळपास नव्हते. सपोनि दादा गोरे यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी दोन्ही घटनास्थळ परिसराची बारकाईने पाहणी करुन, त्यामध्ये, काही तांत्रिक माहिती प्राप्त करून, त्याचे अचुक विष्लेषण केले.त्यानंतर दि.०६ जानेवारी रोजी सपोनि दादा भोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरील गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार मोहन दौलतराव मुंडे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड) व त्याचा आणखी एक साथीदार अशा दोघांनी मिळून केला आहे. तसेच ते दोघे दि. ०६ जानेवारी रोजी पुन्हा सोलापूर शहरात घरफोड्या करण्यासाठी आले असून, ते जुना विजापूर नाका,  परिसरातील धर्मवीर संभाजी तलावाच्याकाठी बसले आहेत. या माहितीवरून फौजदार अल्फाज शेख, इम्रान जमादार व विनोद रजपूत यांनी आरोपींचा माग काढला. कौशल्याने  सापळा लावून, संशयित आरोपी मोहन मुंडे व त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी दुसऱ्या साथीदाराचे नाव सोहेल जलील शेख, (वय-२० वर्षे, रा. करबला वेस, दमगान पूरा, आंबेजोगई, जि.बीड) असे असल्याचे निष्पन्न झाले.

या दोघांकडे तपास केल्यावर त्यांनी पोलीस निरीक्षक भोसले व पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करण्यासाठी हे दोघे कारने आले होते असेही निष्पन्न झाले. त्यांनी कटावणीने घराचे कुलूप उचकटून चोरी केलेले दागिने व रोख रक्कम काढून दिली. या घरपोडीच्या तपासासाठी राजकुमार पवार, बापू साठे, सुभाष मुंडे, सतीश काटे, बाळासाहेब काळे, सायबर पो.स्टे कडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, वसीम शेख, इब्राहीम शेख यांचेही मोठे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *